सार्सी गावाने मागितली आत्महत्येची परवानगी
By Admin | Published: October 29, 2015 12:27 AM2015-10-29T00:27:10+5:302015-10-29T00:27:10+5:30
सोयाबीनची झडती किलोवर आली, कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव आहे. खरीप बुडाला, विहीर आहे पण वीज नाही, रबीचे पीक धोक्यात आहे.
खरीप बुडाला, तरीही पैसेवारी वाढली कशी ? : यशोमती ठाकूर यांनी फोडला प्रशासनाला घाम
अमरावती : सोयाबीनची झडती किलोवर आली, कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव आहे. खरीप बुडाला, विहीर आहे पण वीज नाही, रबीचे पीक धोक्यात आहे. पैसेवारी वाढली आहे. जगावे कसे, असा संतप्त सवाल करीत तिवसा तालुक्यातील सार्सी येथील शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक देऊन आत्महत्येची परवानगी मागितली. तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केलेल्या आक्रमक नेतृत्वामुळे काही समस्या त्वरीत निकाली काढण्यात आल्यात.
सार्सी येथे अनेक दिवसांपासून वीज नाही. तासाभरापुरती आलीच तर विद्युत भार नसतो. त्यामुळे तीन दिवसांत १५ कृषीपंप जळालेत. रबीची पेरणी कशी करावी, अशी विचारणा आ. ठाकुर यांनी आयुक्तांना केली. यावर वीज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता बसेरीया, श्रीराव आदींना आयुक्तांनी तत्काळ बोलाविले. माहुली येथून नांदगाव पेठ येथील एमआयडीसीमध्ये काही उद्योगांना वीज दिली, सार्सी गावाला पुरवठा का नाही, अशी विचारणा आ. ठाकूर यांनी कार्यकारी अभियंत्यांना केली. यावर त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यावर आ. ठाकूर यांनी त्यांना खडेबोल सुनावले. खरिपाची नापिकी, वीज वितरणाच्या समस्या व स्थानिक समस्यांनी त्रस्त सार्सी येथील शेकडो नागरिकांनी आ. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवर वाढीव पैसेवारी लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी आयुक्तांशी चर्चेदरम्यान केला.
ग्रामपंचायतीचा कर्जमुक्तीचा ठराव !
सोयाबीनचे उत्पन्न नाही, वीज बेपत्ता असते. ओलीताची सोय नाही, शासनाने सार्सीची पैसेवारी ५० पैशांच्या आत लावावी. गाव १०० टक्के कर्जमुक्त करावे, असा ठराव सार्सी ग्रापंने ९ आॅक्टोबरला पारीत केला. तो बुधवारी आयुक्तांना दिला.
विजेची समस्या महिनाभरात निकाली
सार्सी येथील विजेची समस्या महिनाभरात निकाली काढली जाईल. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पूर्ण भाराचा वीज पुरवठा केला जाणार आहे. शेतकऱ्यांनीदेखील ‘कॅपेसीटर’ लावावेत, असे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आयुक्तांना दिली ‘लाल्या’ची कपाशी
सोयाबीन गेले, कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव आहे. पानगळ, बोंडगळ सुरू आहे. पाण्याअभावी कपाशीची मुळे सुकली आहेत. तरीही पैसेवारी का वाढते आहे, अशी विचारणा करीत शेतकऱ्यांनी ‘लाल्या’युक्त कपाशीचे पीक विभागीय आयुक्तांच्या स्वाधिन केले.
विचोरी तलावातून मिळणार पाणी
सार्सी येथे विचोरी पाझर तलाव आहे.येथून उपसा सिंचन करायला जिल्हा परिषदेची परवानगी नव्हती. आयुक्तांनी याविषयी अधिकाऱ्यांना त्वरीत निर्णय घेण्याचे आदेश दिले. यामुळे काही शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.
खरे बोला, आमदारांनी सुनावले
सार्सी येथे कित्येक दिवसांत वीज नाही. मात्र, माहुलीतून कारखान्यांना वीज विकली. यावर कार्यकारी अभियंता बसेरीया यांनी गुळगुळीत उत्तर दिले. यावर यशोमतींनी आक्रमक होऊन ‘खरे बोला’ असे अभियंत्याला खडसावले. अधिकाऱ्यांना त्यावेळी घाम फुटला.