संप, आत्महत्या हा पर्याय नव्हे !
By Admin | Published: February 7, 2015 12:04 AM2015-02-07T00:04:42+5:302015-02-07T00:04:42+5:30
मानवाचे जीवन ईश्वराची देण असून प्रत्येक संकटावर मात करीत एकमेकास सहकार्य करणे हा मानव धर्म आहे.
अमरावती : मानवाचे जीवन ईश्वराची देण असून प्रत्येक संकटावर मात करीत एकमेकास सहकार्य करणे हा मानव धर्म आहे. त्यामुळे जगताना कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास संप किंवा आत्महत्या हा पर्याय नाही, असा मंत्र मुंबईचे डबेवाला असोशिएशनचे संचालक रघुनाथ मेडगे यांनी शुक्रवारी येथे दिला.
येथील दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित कीर्ती तंत्रनिकेतन व विक्रशीला तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय व्याख्यानात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी विशेष अतिथी म्हणून राजेंद्र गवई, बाळासाहेब अढाऊ, पवन देशमुख, उमेश ठाकरे आदी उपस्थित होते. पुढे विद्यार्थ्यांना मुंबई डब्बेवाल्यांच्या व्यवस्थापनाची माहिती देताना मेडगे यांनी १८९० पासून सुरु झालेल्या या व्यवसायाचा प्रवास आजतागायत सुरु आहे. ऊन, वारा, पाऊस काहीही असो मुंबईकरांना दुपारी साडेबारा वाजता जेवणाचा डबा त्यांच्या हाती देण्याची किमया डबेवाले करतात. दरदिवसाला डबेवाला १५० कि.मी. प्रवास करतात. ५ हजार डबेवाले तेथे कार्यरत आहेत. डबे वाटपाचे अचूक नियोजनासाठी ८०० चमू (मोकादम) कार्यरत आहेत. मुंबईतील दोन लाख डब्यांची ने- आण करताना ज्या व्यक्तीचा डबा त्याच व्यक्तीच्या हाती मिळावा, यासाठी रंग संकेत (कलर कोड) आहे. एका डब्बेवाल्याकडे ४० डब्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डबेवाल्यांच्या व्यवस्थापनात ८५ टक्के निरक्षर तर १५ टक्के साक्षर आहेत. डबेवाल्यांच्या व्यवस्थापनात मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल रेल्वे ही मैलाचा दगड ठरत असल्याचे मेडगे यांनी सांगितले. मुंबई धावत असताना याच धावण्याला जाती, धर्माचे बंधन तोडून अधिक गती देण्याचे काम डबेवाला करीत आहे.