वंचितचे ठरले; सुजात आंबेडकर अमरावतीचे उमेदवार!

By उज्वल भालेकर | Published: March 9, 2024 09:44 PM2024-03-09T21:44:48+5:302024-03-09T21:45:06+5:30

पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला ठराव

Sujat Ambedkar candidate of Amravati | वंचितचे ठरले; सुजात आंबेडकर अमरावतीचे उमेदवार!

वंचितचे ठरले; सुजात आंबेडकर अमरावतीचे उमेदवार!

अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने अमरावती मतदारसंघावर आपली दावेदारी केली आहे. त्या अनुषंगाने स्थानिक पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक पार पडली. यामध्ये अमरावतीमधून वंचितचे युवा नेतृत्व सुजात आंबेडकर यांनी निवडणूक लढवावी, अशा ठराव घेण्यात आल्याची माहिती वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पत्र परिषदेत दिली.

लोकसभा निवडणुकीची तयारी होत असताना, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा अजूनही महाविकास आघाडीतील नेत्यांशी सुसंवाद होत नसल्याचे स्पष्ट आहे. महाविकास आघाडीसोबत युती झाल्यानंतरही अमरावती मतदारसंघावर वंचितकडून दावेदारी सांगितली जात आहे. महिन्याभरापूर्वीच अमरावती येथे प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या महासंमेलनातून शक्तिप्रदर्शन घडविले होते. अशातच आता वंचितने अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बाबासाहेबांचे पणतू, तर प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा ठराव एकमताने घेण्यात आल्याचे वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पत्र परिषदेत स्पष्ट केले. यावेळी अक्षय नरगडे, सूरज गवई, अभिजीत देशमुख, अंकुश वाकपंजार, बाबाराव गायकवाड, सुरेश तायडे, भारती गुडदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Sujat Ambedkar candidate of Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.