सुकन्या झाली ‘नकोशी’; विवाहितेचा अनन्वित छळ!
By प्रदीप भाकरे | Published: November 14, 2022 02:20 PM2022-11-14T14:20:34+5:302022-11-14T14:21:10+5:30
मुुुलाऐवजी मुुलगी झाल्याने एका विवाहितेचा सासरकडून अनन्वित छळ करण्यात आला. त्या असह्य जाचाने कळस गाठल्याने अखेर त्या विवाहितेने पोलीस ठाणे गाठले.
अमरावती:
मुुुलाऐवजी मुुलगी झाल्याने एका विवाहितेचा सासरकडून अनन्वित छळ करण्यात आला. त्या असह्य जाचाने कळस गाठल्याने अखेर त्या विवाहितेने पोलीस ठाणे गाठले. महिला सेलमध्ये आपसी समेट घडून न आल्याने विवाहितेच्या पतीसह सासरच्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. १२ नोव्हेंबर रोजी रहमतनगर येथे हा प्रकार उघड झाला.
याप्रकरणी, विवाहितेच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी शनिवारी शाहरूख खान मन्नान खान (२६), मन्नान खान (५०) व चार महिला (सर्व रा. रहेमतनगर गल्ली नंबर १, अमरावती) यांच्याविरूध्द कौटुंबिक छळ, मारहाण, जीवे मारण्याची धमकी व शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला.
येथील एका तरूणीचे आरोपी शाहरूखखान याच्याशी रितीरिवाजाने लग्न झाले. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच तिचा छळ सुरू झाला. तिच्या पोटी मुलगी येताच त्यात भर पडली. मुलगी का झाली, अशी विचारणा करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. माहेरहून चांगला पलंग आण, मुलाला गाडी घेण्यासाठी पैसा आण, असा तगादा तिच्यामागे लावण्यात आला. नकार दिला असता, तिला शिवीगाळ व मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबत तिने १२ नोव्हेंबर २०२१ रोजी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ती तक्रार आयुक्तालयातील महिला सेलला पाठविण्यात आली. मात्र, वर्षभर झालेल्या समुपदेशनानंतरही त्यांच्यात समेट घडून आला नाही. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्र महिला सेलने ७ नोव्हेंबर रोजी नागपुरी गेट पोलीस ठाण्याला दिले. त्यावर १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी विवाहितेचा पती, सासरा व चार महिलांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.