महायुतीतून अमरावतीत सुलभा खोडके, दर्यापुरातून अडसूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 11:25 AM2024-10-24T11:25:00+5:302024-10-24T11:25:34+5:30
Amravati : इच्छुक उमेदवारांची घालमेल; भाजपच्या एका गटात नाराजीचा सूर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच महायुती, महाविकास आघाडीने उमेदवारांची चाचपणी चालविली आहे. पक्ष नेत्यांकडून 'मेरिट' उमेदवारांचा शोध घेताना काही दिवसांपासून पक्षप्रवेशाची धूम सुरू आहे. अशातच काँग्रेसच्या अमरावती शहराच्या आमदार सुलभा खोडके यांनी बुधवारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. एवढेच नव्हे तर सुलभाताईंनी महायुतीतून अमरावतीची उमेदवारीदेखील पदरात पाडून घेतली आहे.
दर्यापुरातून शिंदेसेनेचे अभिजित अडसूळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. दर्यापूरच्या जागेसाठी गत काही दिवसांपासून भाजप आणि शिंदसेनेत वाटाघाटी सुरू होत्या. परंतु दर्यापूर मतदारसंघ हा परंपरागत युतीत शिवसेनेचा असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी आग्रह धरला होता, हे विशेष.
महायुतीने धर्म पाळला, आता अमरावतीत 'घड्याळ'
महायुतीत जागा वाटपाच्या फॉर्म्युलानुसार विधानसभा निवडणुकीत सिटींग आमदारांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार अमरावतीची जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेली असून आ. सुलभा खोडके यांनी बुधवारी मुंबई येथे राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना उमेदवारीसुद्धा जाहीर झाली. खोडकेंना अमरावतीतून उमेदवारी दिल्याने महायुतीने धर्म पाळला, असे स्पष्ट झाले आहे. आ. खोडके यांनी शहराच्या विकासासाठी भरीव निधी खेचून आणला, ही त्यांची जमेची बाजू आहे. अमरावती महानगरात वाढीव मालमत्ता कर जुन्याच दराने वसुलीचा निर्णय, अमृत वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर, विविध प्रशासकीय इमारतींची उभारणी यासह पायाभूत सुविधांवर खोडके यांनी भर दिला आहे. त्यामुळे विकासाच्या जोरावर त्यांची उमेदवारी महायुतीत किती यशस्वी होते, हा येणारा काळच ठरवेल.
अखेर कॅप्टन अडसुळांचे विमान दर्यापुरात उतरले...
माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांना दर्यापूरची जागा कायम ठेवण्यात यश आले आहे. भाजपनेही दर्यापूर हवे, अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्यापूर सोडून बोला? अशी ठोस भूमिका घेतल्याने भाजपला दोन पावले मागे सरकावे लागले. अखेर मंगळवारी उशिरा शिंदेसेनेने दर्यापुरातून कॅप्टन अडसूळ यांना उमेदवारी दिली. अडसूळ हे पेशाने वैमानिक असून दर्यापूर मतदारसंघाशी त्यांचे माजी आमदार म्हणून जवळीक आहे. शिंदेसेना युवक आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीसपदी ते कार्यरत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी आग्रह धरला नि दर्यापूरची जागा शिंदेसेनेला महायुतीतून सुटली. राजकीय घडामोडींनंतर महायुतीतून दर्यापूरच्या जागेवर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आता कॅप्टन अडसुळांचे विमान दर्यापुरात उतरले खरे, पण येत्या काळात भाजपची बंडाळी डोकेदुखी ठरणारी आहे.
बडनेरातून उद्धवसेनेचे सुनील खराटे, अमरावतीत मनसेकडून पप्पू पाटील
उद्धवसेनेने अमरावती जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांना बडनेरा मतदारसंघाची उमेदवारी दिली. या मतदारसंघात प्रीती बंड यांनीदेखील दावेदारी केली होती. किंबहुना सन २०१९ मधील निवडणुकीत ७४९१९ मते घेत बंड दुसऱ्या क्रमांकावर होत्या. आता सुनीट खराटे हा नवा चेहरा उद्धवसेनेने बडनेरा मतदारसंघात दिला आहे. जिल्हात उद्धवसेनेची एकमात्र उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर अमरावती मतदारसंघातून मनसेने पप्पू पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे.