सारांश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:12 AM2021-04-17T04:12:45+5:302021-04-17T04:12:45+5:30
दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ अचलपूर : माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी ३० वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात ...
दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ
अचलपूर : माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी ३० वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. शिवीगाळ करून दुसरे लग्न करण्याची धमकी देण्यात आली. अचलपूर पोलिसांनी आरोपी शेख नियामत, शेख रहमत, शेख अजमत, शेख नाजिम, शेख शाकीर व दोन महिला (सर्व रा. वडनेर गंगाई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
------------
धामोरी येथील विकासकामांसाठी ३० लाख
भातकुली : प्रादेशिक पर्यटन योजनेत सांसद आदर्श ग्राम धामोरी येथील विकासकामांसाठी २ कोटी ५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी प्रत्येकी ३० लक्ष रुपये निधी दोन टप्प्यांत प्राप्त झाला. नियोजित कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पालकमंत्री ठाकूर यांनी प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा केला.
----------
गावोगावी उपकेंद्रावरही कोरोना लसीकरण
कावली वसाड : जिल्ह्यात अधिकाधिक व्यक्तींचे लसीकरण होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांनंतर उपकेंद्रांवरही लसीकरणाची सुविधा देण्यात येत आहे. त्यानंतर गावोगाव शिबिरे घेण्याचेही नियोजन आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
---------
शहानूर रस्त्याच्या बांधकामाला मुहूर्त मिळेना
अचलपूर : तालुक्यातील शहानूर रस्त्याच्या बांधकामाचे तीनतेरा झाले आहेत. रस्त्याची चाळणी झाली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले. आजी-माजी आमदारांना निवेदनातून रस्त्याबाबत अवगत करून दिले. मात्र रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
---------------
गहू काढणीला मजूर मिळेना
दर्यापूर : काही वर्षांपूर्वी फक्त दूरध्वनीवर संपर्क साधल्यास गहू काढणीला शेकडो मजूर येत असत. यंदा उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. तालुक्यातील बरेच शेतकरी या मजुरांना आणण्यासाठी गेले असता, हे मजूर येण्यास तयारच होत नाहीत. त्यामुळे गहू काढणीला मजूर मिळेनासा झाला आहे.
---------------
महेंद्री संवर्धन राखीव क्षेत्र कागदावर
वरूड : अभयारण्याऐवजी महेंद्री जंगल ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ घोषित करून तसा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश वनविभागाला देऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात नसल्याने महेंद्री संरक्षित जंगलाचे घोडे कुठे अडले, असा वरूड तालुकावासीयांचा सवाल आहे.
----------------
ठक्कर बाप्पा योजनेच्या माथी सदोषता
वरूड : तालुक्यात ठक्कर बाप्पा आदिवासी सुधार योजनेत समावेश असलेल्या आदिवासी गावांमध्ये लाखो रुपयांची कामे निकृष्ट झाल्याची ओरड आहे. अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने कामे केली जात असून, कमिशनच्या ओझ्याखाली प्रतवारी घसरली आहे.
--------------
इर्विन मार्गावर हवे गतिरोधक
अमरावती : पंचवटी ते इर्विन या महामार्गावर संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन या रस्त्यावर गतिरोधक असणे अत्यंत निकडीचे झाले आहे. पंचवटीकडून वा उड्डाणपुलावरून इर्विनकडे जाणारी वाहने अत्यंत वेगाने पुढे जातात. शिवाजी सायन्स कॉलेजसमोर महामार्गाच्या दुभाजकाला वळसा घेत अनेक वाहने क्रीडा संकुलात येतात. येथे अनेक छोटे-मोठे अपघातही घडले आहेत.
-----------------
मेळघाटचे दावानल मानवनिर्मित
धारणी : मेळघाटच्या जंगलात दरवर्षी आगी लावण्याचे प्रकार सर्वाधिक प्रमाणात घडत आहेत. हजारो हेक्टर जंगलाची राखरांगोळी त्यातून होते. दुसरीकडे साप, विंचू या सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाघ, अस्वल, बिबट, रानगवे, हरिण, सांबर, नीलगाय आदी प्राण्यांना जंगलात जीव वाचवीत सैरभर पळावे लागते. मात्र, वनविभाग मानवनिर्मित आगीच्या प्रकाराने हतबल झाला आहे.