सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:07 AM2021-05-03T04:07:55+5:302021-05-03T04:07:55+5:30

परतवाडा : कांडली येथील नाईक प्लॉटस्थित देशी दारूचे दुकान फोडून ६५ हजार रुपयांची दारू लंपास करण्यात आली. २६ एप्रिल ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

परतवाडा : कांडली येथील नाईक प्लॉटस्थित देशी दारूचे दुकान फोडून ६५ हजार रुपयांची दारू लंपास करण्यात आली. २६ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी राजेंद्र जयस्वाल यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

------------

मुगलाईपुऱ्यातून दुचाकी लंपास

परतवाडा : येथील मुगलाईपुऱ्यातून एमएच २७ / ५३९२ या क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. १७ मार्चच्या रात्रीदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी रामदास घोरपडे (५०, मुगलाईपुरा) यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

-----------------

शिरभातेनगरातून दुचाकी लांबविली

परतवाडा : येथील शिरभातेनगर भागातून शुभम बरधे (२५, सावळी, खेलतपमाळी) याची एमएच २७ बीएम २९३१ या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. ४ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी २६ एप्रिल रोजी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

-----------

वरूड तालुक्यातून बकऱ्या लांबविल्या

वरूड : तालुक्यातील एकदरा येथील वेशधारी चौधरी यांच्या शिवारातून २४ हजार रुपये किमतीच्या सहा बकऱ्या लंपास करण्यात आल्या. याप्रकरणी वरूड पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला. तालुक्यात काही दिवसांपासून बकऱ्या चोरीचे सत्र आहे.

------------------

शिवारातील धान्य मालावर चोरांची वक्र नजर

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील रायपूर कासारखेड शिवारातील गोडाऊनमधून तुरीचे सात कट्टे चोरीला गेले. मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी शेतकरी उत्तम डाहाके (६८, रायपूर कासारखेड) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

-------

सर्वसामान्यांनी रेती आणावी कुठून?

अचलपूर : परप्रांतातून येणाऱ्या गौण खनिजांवरसुद्धा बंदी आणली गेली आहे. यावर तोडगा काढण्यात शासन व प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे अचलपूर उपविभागातील नव्या बांधकामावर मोठ्या प्रमाणात गदा आली आहे. बांधकाम करायचे कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. व्यावसायिकांनाही रेतीघाट लिलावाची प्रतीक्षा लागली आहे.

--------------

शेतकऱ्यांना केव्हा मिळणार वीजजोडणी?

येवदा : नवीन कृषिपंपांना वीज खांबापासून सर्व्हिस वायरद्वारे ३० मीटरपर्यंत एका महिन्यात, तर २०० मीटरपर्यंत एरियल, लघु दाब विजवाहिणीद्वारे तीन महिन्यात देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शेतकरी वर्ग नवीन वीज जोडणीपासून वंचित आहे. आश्वासनाची त्वरित पूर्तता करून वंचित शेतकऱ्यांना वीजजोडण्या देण्याची मागणी होत आहे.

--------------

पाणीपातळी खोल, तरीही बोअरचा सपाटा

जरूड : जिल्हाधिकाऱ्यांनी बोअर करणाऱ्या रिंग माउंटेड मशीनवर बंदी घातली असताना त्या मशीन येऊन बोअर करून जातात. तालुक्यात कोरोना वेगाने फैलावत असताना अधिकारी व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन काही दलाल अधिक रक्कम घेऊन अवैध बोअर करून देत आहेत. काही भागात भर दिवसा बोअर केली जात आहेत.

----------

चिखलदऱ्यातील वाड्या-वस्त्यांत पाणीटंचाईचा प्रश्न

चिखलदरा : तालुक्यातील ३५ पेक्षा अधिक पाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांच्या योजना आणि विविध उपक्रम राबविले जात असतात. मात्र या ३५ गावांतील पाणीटंचाई जैसे थे आहे. अनेक गावांत टँकरवारी सुरू झाली आहे.

---------------

कोरोना लॉकडाऊनमुळे लग्न प्रसंगावर मर्यादा

दर्यापूर : राज्यात संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी जाहीर झाल्याने सर्व लग्न सोहळ्यात अडचणी आल्या आहेत. ग्रामीणमध्ये काही ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. केवळ २५ जणांनाच परवानगी व त्यात २ तासांत लग्न आटोपणे बंधनकारक असल्याने अनेक लग्न पुढे ढकलण्यात आले आहे.

------------------

ग्रामीण भागात लॉकडाऊनचा बोजवारा

राजुरा बाजार : ग्रामीण विभागात प्रशासन पोहचत नसल्यामुळे स्थानिक प्रशासनाला नागरिकांनी हूल दिल्याचे चित्र राजुरा बाजार येथे दिसत आहे. काम नसताना व्यर्थ घराबाहेर पडणे, मास्क न घालणे, १४४ जमावबंदी कलम लागू असूनही अनावश्यक गर्दी करणे, सोशल डिस्टंसिगचे नियम न पाळणे, असले प्रकार येथे रोजच पहायला मिळत आहे. स्थानिक प्रशासनाला न जुमानता लोक बिनधास्त एकीकडून दुसरीकडे ये-जा करत आहे.

----------------

पुसला सील, लॉकडाऊनचे पालन

पुसला : वरूड तालुक्यात कोरोनाचा विळखा वाढला असून पुसला परिसरातदेखील कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. विना मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. स्थानिक प्रशासनाकडून सुद्धा पाहिजे तशी जबाबदरी घेत नसल्याचे दिसून येते. आता प्रशासनाकडून पुसला सील करण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना त्रिसूत्रीचे पालन होण्यास मदत होणार आहे.

-----------

वाठोडा शुक्लेश्वर- म्हैसपूर मार्ग खड्डेमय

भातकुली : तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर मार्ग वर्दळीचा आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून किरकोळ अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.

--------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.