सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:12 AM2021-05-14T04:12:42+5:302021-05-14T04:12:42+5:30

वरूड : जिल्हाधिकाऱ्यांनी बोअर करणाऱ्या रिंग माउंटेड मशीनवर बंदी घातली असतानादेखील तालुक्यात बोअर केले जात आहे. तालुक्यात कोरोना वेगाने ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

वरूड : जिल्हाधिकाऱ्यांनी बोअर करणाऱ्या रिंग माउंटेड मशीनवर बंदी घातली असतानादेखील तालुक्यात बोअर केले जात आहे. तालुक्यात कोरोना वेगाने पसरत असताना अधिकारी व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन काही दलाल अधिक रक्कम घेऊन अवैध बोअर करून देत आहेत. त्यामुळे वरूड तालुक्यातील विहिरींची पाणीपातळी खोल गेली आहे.

----------

मेळघाटातील दुर्गम गावांमध्ये पाणीटंचाईचे चटके

धारणी : मेळघाटमधील चिखलदरा व धारणी या दोन्ही तालुक्यांतील पाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील अनेक गावांत टँकरवारी सुरू झाली आहे. मात्र येथे शाश्वत उपाययोजना, अंमलबजावणीची गरज आहे.

---------------

बॅन्डबाजा, बारातीवर पुन्हा लॉकडाऊन

येवदा : राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. संचारबंदी जाहीर झाल्याने सर्व लग्न सोहळ्यात अडचणी आल्या आहेत. ग्रामीणमध्ये काही ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. केवळ २५ जणांनाच परवानगी व त्यात २ तासात लग्न आटोपणे बंधनकारक केल्याने अनेक लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. बॅन्डबाजा, बारातीवर पुन्हा लॉकडाऊन कोसळले आहे.

------------------

ग्रामीण भागात लॉकडाऊनचा बोजवारा

शेंदूरजनाघाट : ग्रामीण विभागात प्रशासन पोहचत नसल्यामुळे स्थानिक प्रशासनाला नागरिकांनी हूल दिल्याचे चित्र वरूड तालुक्यात दिसत आहे. काम नसताना व्यर्थ घराबाहेर पडणे, मास्क न घालणे, अनावश्यक गर्दी करणे, सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळणे, असे प्रकार येथे रोजच पहायला मिळत आहे. स्थानिक प्रशासनाला न जुमानता लोक बिनधास्त एकीकडून दुसरीकडे ये-जा करत आहे.

----------------

वाठोडा शुक्लेश्वर- म्हैसपूर मार्गाची दुरुस्ती केव्हा?

भातकुली : तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर मार्ग वर्दळीचा आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून किरकोळ अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. त्या मार्गाची दुरुस्ती केव्हा, असा सवाल आहे.

--------------

मेघनाथपुरातून गाय, गो-हा पळविला

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील मेघनाथपूर येथून अर्जुन मन्वर यांच्या घरातून २० हजार रुपये किमतीची गाय व गो-हा लंपास करण्यात आला. याप्रकरणी सरमसपुरा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. अचलपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात जनावरे चोरीला जाण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

------------

मल्हारा येथून दुचाकी लांबविली

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील मल्हारा येथून राजाभाऊ शेनवारे (५१) यांच्या मालकीची एमएच २७ बीआर ५५०८ या क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. परतवाडा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. तालुक्यात दुचाकी चोरीचे सत्र थांबलेले नाही.

------------------

फोटो पी १३ कु-हा

कु-हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना रमजान ईदनिमित्त भेट

कु-हा : येथील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत कर्मचारी व मजुरांना रमजान ईदनिमित्त भेट देण्यात आली. १२ मे रोजी सरपंच मीना नायर यांच्या हस्ते कर्मचारी शे.रफिक शे.कादर, अफसर बेग अक्तर बेग, इब्राहीम खान सरदार खान, शे.इब्राहीम शे.इनायत, शासनमियाँ अल्ली मियाँ अशा पाच कर्मचारी व मजुरांना भेट देण्यात आली. याप्रसंगी सुनीलबाबा नायर, शे.ईसराईल ऊर्फ गुड्डू शे.कामील, अनुग्रह नायर उपस्थित होते.

------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.