सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:12 AM2021-05-19T04:12:47+5:302021-05-19T04:12:47+5:30

अंजनगाव सुर्जी : येथील बारगणपुऱ्यातील ३२ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. घरगुती कारणावरून १६ मे रोजी ही घटना घडली. ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

अंजनगाव सुर्जी : येथील बारगणपुऱ्यातील ३२ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. घरगुती कारणावरून १६ मे रोजी ही घटना घडली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रमोद महादेवराव भावे (४०, बारगणपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------

वरूडच्या कृष्णार्पण कॉलनीतील घर फोडले

वरूड : येथील कृष्णार्पण कॉलनीतील सुरेंद्र गोहाड यांचे घर फोडून सुमारे २६ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. गोहाड हे अमरावतीला असताना, १६ मे रोजी हा प्रकार उघड झाला. चोराने त्यांच्या घरातून एलईडी टीव्ही, सेटअप बॉक्स, डीव्हीडी चोरून नेला. वरूड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------

चिंचोली गवळी येथे मारहाण

मोर्शी : तालुक्यातील चिंचोली गवळी येथे रघुनाथ हटकर (५०) यांना काठीने मारहाण करण्यात आली. काकाला काल रात्री का मारहाण केली, अशी विचारणा करीत १६ मे रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आरोपी धनराज हटकर (१९, रा. चिंचोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

मंगरूळ दस्तगीर येथे महिलेला मारहाण

मंगरूळ दस्तगीर : येथील एका महिलेला मारहाण करण्यात आली. हिस्सेवाटणीवरून १६ मे रोजी हा वाद झाला. याप्रकरणी मंगरूळ पोलिसांनी आरोपी जगदीश झाडे (२५, रा. येवती, जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

खुर्माबाद येथे तरुणाला मारहाण

दर्यापूर: तालुक्यातील खुर्माबाद येथे सचिन गवळी (३५) याला मारहाण करण्यात आली. १६ मे रोजी सकाळी ही घटना घडली. यात सचिनचे डोके फुटले. खल्लार पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अनिल पुरी, सुनील पुरी, गजानन पुरी, निखिल पुरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------

ब्राम्हणवाडा थडी येथे मारहाण

ब्राम्हणवाडा थडी : येथील विनोद तायडे (४४) यांना बेदम मारहाण करण्यात आली. दुचाकीची रक्कम परत मागितली असता, १२ मे रोजी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी आरोपी संदीप सिरसाट (४०) व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. झेंडा चौकात ही मारहाण करण्यात आली.

----------

मालखेड येथे कोरोना नियंत्रण समितीची बैठक

चांदूर रेल्वे : तालुक्यातील मालखेड या गावात ठाणेदार मगन मेहते यांनी ग्रामभेट देऊन मालखेड येथील पोलीस चौकीत कोरोना नियंत्रण समितीची बैठक घेतली. यामध्ये ठाणेदारांनी मार्गदर्शक सूचना देऊन शासनाच्या सर्व सूचनांचे व नियमांचे पालन करण्याचे तथा मालखेड येथील सुरू असलेल्या लसीकरणाचा सर्वांना लाभ घेण्याचे आवाहन केले.

--------------

माहिती अधिकाराच्या नावावर वसुलीचा आरोप

धामणगाव रेल्वे : शहरात राहून तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये माहितीचा अधिकारान्वये अर्ज टाकून वसुलीचे नवे तंत्र वापरले जात असल्याने ग्रामपंचायती पंचायत समिती व महसूल विभाग त्रस्त झाला आहे. दरम्यान कक्षेत बसत नसलेली माहिती न मिळाल्याने त्याबाबत खंडणीची मागणी केली जात असल्याचा आरोप आहे.

---------------

झुडपात गांजा पिणाऱ्यांचे टोळके

परतवाडा: कुटीर रुग्णालय व राजा शिवाजी विद्यालय या परिसरातील झुडपी जंगलात गांजा पिणाऱ्यांचे टोळके चिलीम ओढत बसलेले असतात. त्यावर स्थानिक पोलिसांनी आवर घालावा, अन्यथा येथे एखादी घटना घडल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया येथे उमटली आहे.

----

गणित, विज्ञान विषय शिक्षकांच्या भरतीला ‘ब्रेक’

अमरावती : राज्याच्या शिक्षण विभागाने १० ते १५ वर्षांपासून गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची भरती न केल्यामुळे तसेच कार्यरत शिक्षक ज्येष्ठतेनुसार सेवानिवृत्त झाल्याने आजही अनेक शाळांमध्ये गणित तसेच विज्ञान शिकविणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागली आहे.

--------

नैसर्गिक झाडे तोडून रोपवनाचा प्रयत्न

परतवाडा : शकुंतला रेल्वेच्या अचलपूर रेल्वे स्थानकासमोरील रेल्वेच्याच खुल्या जागेवरील नैसर्गिक झाडे तोडून अचलपूर समाजिक वनीकरण विभागाने रोपवनाचा प्रयत्न चालवला आहे. यामुळे शकुंतलेच्या ब्रॉडगेजवरच प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

---------

सात लाखांसाठी विवाहितेचा छळ

अमरावती : एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सात लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यासाठी तिला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी पवन काळे, प्रभाकर काळे, अंकुश काळे व एक महिला (सर्व रा. कमला पार्क, यवतमाळ) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------

वरूड तालुक्यात आंबिया बहराचे नुकसान वरूड : लगतच्या सातनूर, पुसला, वाई, धनोडी, मालखेड, झटामझिरी, वरूड, जरूड, लोणी, चांदस वाठोडा, सुरळी कुरळी, तिवसाघाट, बेनोडा, हिवरखेड, पुसली या परिसरात शेतकरी अंबिया बहर मोठ्या प्रमाणात घेतात. येथेच अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. कृषी विभागाने कोळशी, शंखी, डिंक्या व आता नव्याने आलेल्या अज्ञात रोगावर योग्य मागदर्शन करण्याची गरज आहे.

------

पेट्रोल, डिझेल, खतांच्या किमती वाढल्या

येवदा : शेतीच्या एकूण उत्पादन खर्चात रासायनिक खतांवर होणाऱ्या खर्चाचा वाटा जवळपास २० टक्के आहे. एप्रिल २०२१ पासून केंद्र शासनाने खतांच्या किमतीमध्ये जवळपास २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रतिबॅग जवळपास २०० ते ३०० रुपये किमत वाढणार आहे. आधीच महागाई वाढत आहे, त्यातच आता खतांच्याही किमती वाढल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

--------

------------

खाद्यतेलाने बिघडविले बजेट

नांदगाव खंडेश्वर : खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. यामुळे स्वयंपाकघरातील तेलाचा वापर कमी करावा लागत आहे. चपात्या बिनातेलाच्या, तर भाजीतही अत्यंत कमी प्रमाणात तेल टाकावे लागत आहे. त्यामुळे जेवणाची चवसुद्धा खालावली आहे. तेलाचे भाव १७५ ते १९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे.

-----------

सिंभोऱ्यातील अवैध दारू बंद करण्याची मागणी

मोर्शी : अप्पर वर्धा धरणामुळे ओळखले जाणाऱ्या सिंभोरा येथे रस्त्यावरच विविध प्रकारची दुकाने थाटली गेली. या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी ये-जा करतात. या गावातील काही नागरिक अवैध देशी दारूच्या पेट्या आणून दारूची विक्री करीत आहे. ती अवैध दारू बंद करण्याची मागणी महिलांनी केली आहे.

--------------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.