सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:55+5:302021-05-29T04:10:55+5:30
सात गावांत बुद्ध जयंती साजरी काटपूर: बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका कार्यकारिणीने ब्राम्हणवाडा पाठक, ...
सात गावांत बुद्ध जयंती साजरी
काटपूर: बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका कार्यकारिणीने ब्राम्हणवाडा पाठक, सोनोरी, सुरळी, वणी, नानोरी, बेलखेडा, बोरज या गावांत बुद्ध जयंती साजरी केली. ब्राम्हणवाडा गावातील विहारामध्ये संदीप तायडे, सोनोरी येथे सूरज वानखडे व तोषल नवले, सुरळी गावातील विहारात बुद्धभूषण तागडे, वणी येथे योगेश तनोलकर व सुशील सरदार, बेलखेडा येथे अशोक नवले व अवधूत नवले, बोरज येथे जयश्री वासनिक यांच्या हस्ते सामूहिक हारार्पण करण्यात आले.
------------
फोटो पी २८ गणोरी
जिल्हाधिकारी पोहोचले गणोरीत
भातकुली : तालुक्यातील गणोरी येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी भेट दिली. कोविड केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी ते येथे आले होते. सरपंच अजय देशमुख यांच्याशी त्यांनी चर्चा केली. पांदण रस्त्यांसंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल भारसाकळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाबद्दल चर्चा केली व तहसीलदार, तलाठी यांना योग्य ते सहकार्य करण्याचे निर्देश दिले.
---------
शेगाव नाका परिसरात कोरोना चाचणी
अमरावती : शेगाव नाका चौक येथे अकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण २१० कोरोना चाचणी करून घेण्यात आली. सदर ठिकाणी सहायक क्षेत्रिय अधिकारी श्रीवास्तव, स्वास्थ्य निरीक्षक रोहित हडाले, दिनेश निंदाने, सागर राजुरकर, गोरले, अनिल गोहर, श्रीकांत डवरे, लिपिक अमर खट्टर, अनिकेत मिश्रा, खडसान, दीपक सरसे उपस्थित होते.
-------
हमालपुरा येथे २१६ जणांची रॅपिड चाचणी
अमरावती : स्वास्थ्य अधीक्षक विजय बुरे यांच्या उपस्थितीत २७ मे रोजी अकारण फिरत असलेल्या नागरिकांसह मनपा कर्मचा-यांची हमालपुरा परिसर, रेल्वे स्टेशन रोड व कंवर नगर चौक परिसरात आरोग्य विभागाच्या मोबाईल व्हॅन टीमद्वारे रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घेण्यात आली. सदर तपासणी मोहिमेत एकूण २१६ नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घेण्यात आली.
-----------------
फोटो पी २८ कारवाई
छत्री तलाव परिसरात महापालिकेची कारवाई
अमरावती : छत्री तलाव येथे विनाकारण फिरत असल्याने आरोग्य विभागाचे टीमद्वारे एकूण २७९ रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घेण्यात आली. यावेळी राजापेठचे निरीक्षक मनीष ठाकरे यांनीदेखील भेट दिली. यावेळी महापालिका व पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. शुक्रवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.
----------------
मास्क न वापरणाऱ्यांकडून दंडाची वसुली
अमरावती : छत्री तलाव व लगतच्या परिसरात तोंडाला मास्क नसल्याने पाच जणांकडून प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे २५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. कोविड-१९ बाबत जनजागृती करण्यात आली. सदर ठिकाणी पीएसआय कृष्णा मापारी, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक कुंदन हडाले, स्वास्थ्य निरीक्षक, वसुली लिपिक, पोलीस कर्मचारी तसेच झोन क्र. ३ चे कर्मचारी उपस्थित होते.
-----------
आरोग्य परिचारिकांवर कोरोना लसीकरणाचा भार
धामणगाव रेल्वे : उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या चार ते पाच गावांत लसीकरण, कोरोना चाचणी तसेच गाव परिसरात आढळलेल्या कोरोना रुग्णांवर निगराणी, उपकेंद्र अंतर्गत ग्रामस्थांना औषधोपचार, महिलांची प्रसूती अशी दिवसभर काम केल्यानंतर रात्रीला उपकेंद्रात पुन्हा ड्युटी करणे अशी ४८ तासांची सेवा परिचारिकांकडून बजावली जात आहे.
----------
येरड ते चांदूरखेडा, सुलतानपूर रस्त्याची दुर्दशा
चांदूर रेल्वे : तालुक्यातील येरड ते चांदूरखेडा या नागपूर-औरंगाबाद सुपर एक्सप्रेस हायवेपर्यंत दोन किलोमीटर व येरड ते सुलतानपूर या चार किमी रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. या दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण उखडून रस्त्याची गिट्टी बाहेर निघाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. परिमाणी, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
---------------
पीक विम्याची रक्कम केव्हा?
तिवसा : सन २०२०-२१ या वर्षाचा पीकविमा अद्याप मिळाला नाही. गतवर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, संत्रा या पिकांचा विमा काढला. परंतु, दुसरे वर्षे सुरू झाले तरी आजपर्यंत पीकविमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. तेव्हा राज्य शासनाने त्वरित सन २०२०-२१ सालाचा पिकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शेतकरी वर्गाची मागणी आहे.
---------
मोर्शी, वरूडमधील आंबिया बहराला वादळाचा फटका
मोर्शी : मोर्शी व वरुड तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या बागेतील आंबिया बहराला गळती लागली असताना, संत्राझाडांची पाने पिवळी पडून गळत आहेत. तालुक्यातील घोडदेव, पाळा, सालबर्डी, डोंगर यावली, दापोरी, मायवाडी, हिवरखेड, भाईपूर, बेलोना, अंबाडा या भागातील संत्राबागांमधील आंबिया बहराला मोठ्या प्रमाणात फटका बसला.
--------------
धामणगाव तालुक्यात कोरोना संसर्ग वाढताच
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील ५५ गावांत कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असताना, शहरातही आकडेवारी कमी होत नाही. शासनाने लॉकडाऊन घोषित केला. मात्र याचे पालन होतांना दिसत नाही. दिवसा उन्हातही नागरिकांची प्रचंड गर्दी रस्त्यावर पाहायला मिळत असल्याने जमावबंदीचा फज्जा उडाला आहे. प्रशासनाचा कोणताही वचक नसल्याने नागरिक सैराट झाल्याचे चित्र धामणगाव शहरातील आहे.