सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:06 AM2021-05-04T04:06:21+5:302021-05-04T04:06:21+5:30

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळणी शिवारात संतोष कराळे (२१, निंभोरा बोडखा) याला मारहाण करण्यात ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळणी शिवारात संतोष कराळे (२१, निंभोरा बोडखा) याला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मंगरूळ पोलिसांनी आरोपी नीलेश चवरे (३०, रा. निंभोरा बोडखा) याचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

---------------

जिल्ह्यात कांदा काढणीला सुरुवात

तिवसा : जिल्ह्यातील अनेक गावामध्ये कांदा काढणी जोमाने सुरू झाली आहे. यंदा फेब्रुवारी व एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आल्यामुळे कांदा पीक लागवड क्षेत्रात घट झाल्याचे शेतकरी सांगतात. अचलपूर तालुक्यात सर्वाधिक कांदा लागवड आहे.

---------------

शिक्षकांना ५० लाखाचे विमाकवच हवे

अमरावती : कोरोना काळात अध्यापनाव्यतिरिक्त प्रशासनाकडून नेमून दिलेल्या आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील कर्तव्य करत असताना ३१ डिसेंबर २०२० नंतर कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना ५० लक्ष रुपयांची विमा रक्कम मिळावी, अशी मागणी प्रहारकडून करण्यात आली आहे.

---------

जहागीरपूर अस्वच्छ, ग्रामपंचायत निर्धास्त

तिवसा : तालुक्यातील श्रीक्षेत्र जहागीरपूर येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. श्री. महारुद्र मारोती संस्थानच्या पावन भूमीत स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. सगळीकडे नाल्या उपसण्याच्या कामात अनियमितता झाल्याची ओरड आहे. त्यामुळे नालीतील पाणी रस्त्यावर वाहत आहे. ग्रामपंचायतने स्वच्छता करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

--------------

खोदकामामुळे खरिपाची पेरणी करायची कशी?

चांदूर रेल्वे : तालुक्यातील राजुरा येथील कॅनल पाईप लाईनच्या खोदकामामुळे शेतीचे नुकसान झाल्याची तक्रार एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. राजुरा येथील रहिवासी राजेंद्र मधुकरराव सोळंके यांचे शेतातून सात मीटरची पाईपलाईन कालवा जात आहे. कोणत्याही प्रकारची नोटीस न देता त्यांच्या शेतात खोदकाम केले आहे.

---------

कापूस पडलेलाच, खाजेची लागण

दर्यापूर : खारपाणपट्टा असलेल्या दर्यापूर तालुक्यातील अनेक गावांत हजारो क्विंटल कापूस गंजी मारून पडला आहे. भाव नसल्याने शेतकरी तो विकण्यास मागेपुढे करीत आहेत. कापसाची गंजी लावून जास्त दिवस झाल्याने कुटुंबातील सदस्यांना खाजेची लागण झाली आहे.

-----------

पशुवैद्यकीय दवाखान्याला डॉक्टर केव्हा?

करजगाव : शिरजगाव कसबा येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या भागात पशुधनाच्या मृत्यूची मालिका सुरूच आहे. गावातील प्रथम श्रेणी पशू दवाखान्यात अनेक वर्षांपासून पशुवैद्यकीय डॉक्टर नाही. ग्रामस्थांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.

------------

चारित्र्यावर संशय घेऊन छळ

मोर्शी : चारित्र्यावर संशय घेऊन व माहेरहून २ लाख रुपये आणण्याचा तगादा लावत सासरच्या मंडळीने आपला शारीरिक व मानसिक छळ चालविल्याची तक्रार एका ३५ वर्षीय विवाहितेने शिरखेड पोलिसांत नोंदविली. याप्रकरणी हनुमंत कायवाटे, सुभाष कायवाटे, अमोल कायवाटे, दिनेश कायवाटे व दोन महिला (सर्व रा. शिवदासनगर, अकोट) विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

--------------

लॉकडाऊनमध्ये अवैध धंदे जोरात

ब्राम्हणवाडा थडी : शिरजगाव, करजगाव तसेच ब्राम्हणवाडा थडी या गावात अवैध व्यावसायिक बिनधास्त व्यवसाय करताना दिसत आहे. प्रशासनाची धाक, अधिकाऱ्यांचा दरारा कुठेच निदर्शनास येत नाही. जोमात गावठी दारू, अवैध देशी दारू, सागवान तस्करी, वाळू तस्करी, गुटखा विक्री जोमात आहे. गोवंश चोरीचा मोठा प्रकार नुकताच करजगाव येथे उघड झाला.

-------------

पालक म्हणतात, पुरे करा आता ऑनलाईन

राजुरा बाजार : मोबाईलच्या अतिवापरामुळे किरणोत्सारामुळे दृष्टी आजाराने ग्रासले आहे. शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण बंद करावे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून शाळेतच एक-दोन मीटरच्या अंतराने विद्यार्थ्यांना बसवून फळ्यावरचे शिक्षण सुरू करून दृष्टीदोषापासून मुक्ती द्यावी, अशी मागणी पालकांनी व्यक्त केली आहे.

------------

सोयाबीन तेलाचे दर उच्चांकी

चिखलदरा : खाद्य तेलाच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले. यामुळे स्वयंपाक घरातील तेलाचा वापर कमी करावा लागत आहे. ग्रामीण घरात शेंगदाना तेलाऐवजी सोयाबीन तेलाला प्राधान्य दिले जायचे. मात्र, हे तेल आता १६० ते १७० रुपये किलोवर पोहोचल्याने सर्वसामान्य हवालदिल झाला आहे.

-------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.