सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:10 AM2021-05-31T04:10:34+5:302021-05-31T04:10:34+5:30

चांदूर बाजार : तालुक्यातील थुगाव ते कोंडवर्धा रोडवरून रेतीची अवैध वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली. २८ मे ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

चांदूर बाजार : तालुक्यातील थुगाव ते कोंडवर्धा रोडवरून रेतीची अवैध वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली. २८ मे रोजी पहाटे ही कारवाई करण्यात आली. चांदूर बाजार पोलिसांनी आरोपी जुनेद अहमद (२२, रा. थुगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

जैनपूर येथे पांदण रस्त्यावरून वाद

ब्राह्मणवाडा थडी : चांदूर बाजार तालुक्यातील जैनपूर येथील सुधीर तेलमोरे (३२) व त्यांच्या आई-वडिलांशी पांदण रस्त्याच्या कारणातून वाद घालण्यात आला. काठीने मारहाण करण्यात आली. २८ मे रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. चांदूर बाजार पोलिसांनी याप्रकरणी अरविंद वानखडे, प्रफुल वानखडे, श्रीकृष्ण वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

अचलपूर : भरधाव ट्रकच्या धडकेत शेषराव सहदेव इंगळे व महेंद्र मारोतराव इंगळे (४०, दोन्ही रा. बेलज) हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. एमएच २७ सीके ३९२५ क्रमांकाच्या दुचाकीने ते रासेगावहून बेलजकडे जात असताना हा अपघात घडला. सरमसपुरा पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

अचलपुरातून कॅटरिेंग साहित्य लांबविले

अचलपूर : येथील विलायतपुरा भागातील कवीश्वर उघडे (५१) यांच्या एमआयडीसी स्थित गोडाऊनमधून २ लाख ९२ हजार रुपये किमतीचे कॅटरिंग साहित्य लंपास करण्यात आले. २६ ते २८ मे दरम्यान हा प्रकार घडला. अचलपूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------

राजपूर शिवारात महिलेला मारहाण

धारणी: तालुक्यातील राजपूर शिवारात ३० वर्षीय महिलेला काठीने मारहाण करण्यात आली. २८ मे रोजी हा प्रकार घडला. धारणी पोलिसांनी आरोपी बाबूलाल भिलावेकर, सुभाष भिलावेकर (रा. राजपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------

धारणीत लेखाधिकाऱ्याशी भाजीपाला दुकानदाराने घातली हुज्जत

धारणी : येथील सर्व्हे नंबर १२६ या प्रतिबंधित क्षेत्रात चेहऱ्याला मास्क न लावता व सकाळी ११ नंतर भाजीपाला विक्री करणाऱ्याने नगरपंचायतच्या लेखाधिकाऱ्याशी हुज्जत घातली. दंडाची पावती घेण्यासदेखील नकार दिला. २८ मे रोजी सकाळी ११.३० वाजता ही घटना घडली. याप्रकरणी लेखाधिकारी आशिष पवार (२६, धारणी) यांच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी शेख अनिस शेख बशीर व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------------

वाहनाच्या धडकेत दोघे गंभीर

चिखलदरा : तालुक्यातील घटांग रेस्टहाऊसच्या वळणावर एमएच २७ बीएक्स ५३५६ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने अन्य एका चारचाकी वाहनाला धडक दिली. या धडकेत अनूप देशपंथ (३४), रोशनी देशपंथ (२७) व भावनी देशपंथ (३४, सर्व रा. माधवनगर, तिवसा) हे जखमी झाले. २७ मे रोजी सकाळी हा अपघात घडला. चिखलदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

-----------

राधाकृष्ण कॉलनीत चोरी

मोर्शी : येथील एका घरातील आलमारी फोडून १५ हजार रुपयांची सोन्याची चेन, रोख तीन हजार रुपये असा एकूण १८ हजारांचा ऐवज लांबविण्यात आला. २८ मे रोजी ही घटना घडली. मोर्शी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------

भिल्ली येथे वृद्धाला जाळण्याचा प्रयत्न

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील भिल्ली येथे दादाराव यादव (७०) यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना गंभीर दुखापत करण्यात आली. २६ मे रोजी जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली. याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी आरोपी वासुदेव कचरूजी पाटील (रा. भिल्ली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------------

दुचाकी अपघातात तरुण ठार

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील बोरगाव धांदे गावाजवळ दुचाकीला अन्य एका दुचाकीने दिलेल्या धडकेत प्रशांत पुंडलिक कुरळकर (३३, रा. राजुरा, ता. चांदूर रेल्वे) यांचा मृत्यू झाला. २१ मे रोजी दुपारी हा अपघात घडला होता. मृताचा भाऊ प्रकाश कुरळकर (३३) यांच्या तक्रारीवरून मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी एमएच २७ एएल ४५६६ या दुचाकीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

लाडकी येथील युवकाचा मृत्यू

शिरखेड : लाडकी ब. येथील निखिल दिलीपराव भुयार (२९) याचा मृतदेह शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चारगड नदीलगतच्या वस्तीत आढळून आला. शिरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. तो अविवाहित होता.

------------

अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीसाठी भरती नियमांत सुधारणा

अमरावती : राज्यात कार्यरत सुमारे एका लाखापेक्षा अंगणवाडी सेविकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर पदोन्नती देण्याबाबत विचार होत आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या भरती नियमांची निर्मिती करण्याचे आदेशही विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र अंगणवाडी सेविकांना बालविकास प्रकल्प अधिकारी या पदापर्यंत पदोन्नती मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे.

-----------------

राजपुरात जुन्या वैमनस्यातून मारहाण

धारणी: तालुक्यातील राजपूर येथे राजेश भिलावेकर (३०) याला काठीने मारहाण करण्यात आली. जुन्या वैमनस्यातून २८ मे रोजी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. धारणी पोलिसांनी याप्रकरणी राधेलाल रामू बेठेकर (रा. राजपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

--------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.