सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:10 AM2021-05-31T04:10:41+5:302021-05-31T04:10:41+5:30
अमरावती : कोविडकाळात दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावे पाच लाख रुपये मुदती ठेव ठेवून त्यावर येणारे व्याज ...
अमरावती : कोविडकाळात दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावे पाच लाख रुपये मुदती ठेव ठेवून त्यावर येणारे व्याज त्यांना मिळत राहावे, अशी मागणी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. एक पालक गमावलेल्या बालकांना ‘बाल संगोपन’ योजनेत समाविष्ट करत दरमहा २५०० रुपये मदत मंजूर करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
-----------------
मान्यता नसलेल्या बीजी-३ बियाण्याची लागवड करू नये
अमरावती : बोगस व बेकायदेशीर बियाण्यांमुळे शेतीचे व पर्यावरणाचे नुकसान होते. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार अशा बियाण्यांचा वापर व साठवणूक हा गुन्हा आहे. त्यासाठी पाच वर्षे कारावास व एक लाख रूपये दंडाची तरतूद आहे. त्यामुळे शासनमान्यता नसलेल्या बीजी-3 (एचटीबीटी) बियाण्याची लागवड करू नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले.
-----------------
अल्पवयीनांमधील व्यसनाधीनता चिंताजनक
अमरावती : तंबाखूजन्य पदार्थांचा वापर केवळ प्रौढच करतात, असे नाही तर १५ वर्षावरील किशोरवयीन मुलेही करतात, असे आढळले आहे. भारतात जवळपास तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करणारे १५ वर्षांवरील किशोर जवळपास २६७ दशलक्ष आहेत. २८.६ टक्के लोकसंख्येत मुले ४२.४ टक्के, तर मुली १४.२ टक्के आहेत. सध्या १३ ते १५ वर्षे वयोगटातील मुले यात १९ टक्के, तर मुली ८.३ टक्के आहेत आणि सिगारेटचे सेवन करणारे ४.४ टक्के आहेत. ही स्थिती अत्यंत भयावह आहे.
-----------------
गुरुकुंज मोझरी येथे जम्बो कोविड केअर सेंटर
गुरुकुंज मोझरी : ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुविधा वाढविण्यात येत आहे. जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी गुरुकुंज मोझरी येथे १७५ खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. या सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना तात्काळ उपचार सुविधा याठिकाणी उपलब्ध होणार आहे.
----------------
क्लस्टर, कंटेनमेंट झोनमधील जागेची मोजणी ‘लॉकडाऊन’
अमरावती : कोरोना साथीमुळे संचारबंदी लागू असली तरीही कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणची मोजणीची प्रलंबित कामे पूर्ण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. क्लस्टर व कंटेनमेंट झोनमधील जागेची मोजणी करता येणार नाही, असे निर्देश भूमी अभिलेख उपसंचालक व भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक यांना देण्यात आले आहेत.
----------------
विश्व ब्राम्हण दिन कुटुंबासोबत साजरा करा
अमरावती : विश्व ब्राम्हण दिन १ जून रोजी असून, लॉकडाऊन असल्याने सर्व ब्राह्मणांनी हा दिवस घरीच कुटुंबासोबत साजरा करावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय ब्राम्हण सेवा संस्थानचे जिल्हा महासचिव कुमुद पांडेय (शास्त्री) यांनी केले आहे. घरी पूजापाठ व रात्री दिवे लावून पूर्वजांचे स्मरण करण्याचेदेखील आवाहन याद्वारे करण्यात आले आहे.
----------------
पिंप्री येथे कोविड लसीकरण
अंजनगाव बारी : नजीकच्या पिंप्री येथे कोविशिल्ड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ २४ मे रोजी करण्यात आला. लसीकरण सत्राचे उद्घाटन सरपंच vीता अंभोरे व उपसरपंच प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दोन सत्रांमध्ये एकूण १७७ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले. लसीकरण केंद्राला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद करंजेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रिंकुजय केचे यांनी भेट दिली.
----------------
फोटो पी ३० कावली
शेतकऱ्यांना पेरणी यंत्राद्वारे प्रात्यक्षिक
कावली वसाड : कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना पेरणी यंत्राद्वारे पट्टेदार सोयाबीन पेरणी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी धामणगाव रेल्वे येथील कृषी मंडळ अधिकारी के.एम. पाटील, कृषी पर्यवेक्षक एस.एम. बेंडे, कृषी सहायक एल.आर. तायडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले.
----------------
शिक्षकांना वाहतुक भत्ता, बदली रजा द्या
अमरावती : ग्रीष्मकालीन कालावधीत अनेक शिक्षकांच्या सेवा कोरोनाकरीता अधिग्रहीत केल्या आहेत. या शिक्षकांना वाहनभत्ता व बदली रजा देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा अमरावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.