सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:10 AM2021-06-06T04:10:21+5:302021-06-06T04:10:21+5:30
फोटो पी ०५ यशोमती चेंबर ऑफ अमरावती महानगरकडून लसीकरण शिबिर अमरावती : ५ जून रोजी रोजी चेंबर्स ऑफ अमरावती ...
फोटो पी ०५ यशोमती
चेंबर ऑफ अमरावती महानगरकडून लसीकरण शिबिर
अमरावती : ५ जून रोजी रोजी चेंबर्स ऑफ अमरावती महानगरपालिका मर्चंट्स अँड इंडस्ट्रीज अमरावतीद्वारे आयसोलेशन दवाखान्यात व्यापारी व कर्मचारी यांच्याकरिता लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री यशोमती ठाकूर, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे, चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंट्स अँड इंडस्ट्रीज अमरावतीचे अध्यक्ष सुरेश जैन, सचिव घनश्याम राठी उपस्थित होते.
--------
रेतीमुळे अडकली घरकुलांची कामे
भातकुली : वर्षभर रेती न मिळाल्याने तालुक्यातील नव्या बांधकामांवर मोठ्या प्रमाणात गदा आली आहे. बांधकाम करायचे कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. व्यावसायिकांनाही रेतीघाट लिलावाची प्रतीक्षा लागली आहे. सर्वाधिक फटका घरकुलधारकांना बसला आहे.
--------------
खरिपात नाही मिळाले, रबीत देणार काय?
अंजनगाव सुर्जी : नवीन कृषिपंपांना वीज खांबापासून सर्व्हिस वायरद्वारे ३० मीटरपर्यंत एका महिन्यात, तर २०० मीटरपर्यंत एरियल, लघु दाब वीज वाहिनीद्वारे तीन महिन्यांत देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शेतकरी वर्ग हा नवीन वीज जोडणीपासून वंचित आहे. आता खरीप तोंडावर आहे. वीज जोडणी रबी हंगामात देणार काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
--------------
वरूड तालुक्यातील पाणीपातळी खोल
वरूड : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ समजल्या जाणाऱ्या वरूड तालुक्यातील पाणीपातळी खोल गेली आहे. त्यामुळे संत्राबागा वाचवाव्या कशा, असा प्रश्न येथील लाखो शेतकऱ्यांसमोरच उभा ठाकला आहे. तो प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाने सिंचन प्रकल्प मार्गी लावावे, अशी वरूडकरांची मागणी आहे.
----------
कोरोना अनलॉकमुळे लग्नप्रसंगातील गर्दी वाढली
अमरावती : राज्यात संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी जाहीर झाल्याने सर्व लग्न सोहळ्यांत अडचणी आल्या होत्या. केवळ २५ जणांनाच परवानगी व त्यात दोन तासांत लग्न आटोपणे बंधनकारक असल्याने अनेक लग्न पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, आता हळूहळू अनलॉक होऊ लागल्याने लग्नप्रसंगातील गर्दी वाढू लागली आहे.
------------------
ग्रामीण भागात लॉकडाऊनचा बोजवारा
अंजनगाव सुर्जी : ग्रामीण विभागात प्रशासन पोहोचत नसल्यामुळे स्थानिक प्रशासनाला नागरिकांनी हूल दिल्याचे चित्र आहे. काम नसताना व्यर्थ घराबाहेर पडणे, मास्क न घालणे, जमावबंदी कलम लागू असूनही अनावश्यक गर्दी करणे, सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळणे, असले प्रकार येथे रोजच पाहायला मिळत आहेत.
----------------
वाठोडा शुक्लेश्वर-म्हैसपूर मार्ग खड्डेमय
भातकुली : तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर ते म्हैसपूर मार्ग वर्दळीचा आहे. मात्र, या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून, किरकोळ अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याकडे जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.
--------------
महिला बचत गटांद्वारे उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनाचा शुभारंभ
अमरावती : राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या कुटुंबातील महिलांच्या बचतगटांद्वारे मशरूम शेती, मधुमक्षिका पालनातून मधनिर्मिती, कमळाची शेती आदी स्वयंरोजगार निर्माण होणारे उपक्रम राबविण्यात येत असून, विविध उत्पादने तयार केली जात आहेत. हा उपक्रम वाखाणण्यासारखा असून, या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी ‘उडान’ व महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यासपीठ मिळवून दिले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे दिली.
-------------
चाईल्ड लाईनच्या क्रमांकावर द्यावी माहिती
अमरावती : जिल्ह्यात कोरोनामुळे एक किंवा दोन पालक गमावलेले १६६ मुले-मुली आहेत. त्यात दोन्ही पालक मृत्यू पावलेली आठ बालके आहेत. त्यांना संगोपन योजनेचा लाभ किंवा आवश्यकतेनुसार संस्थेत दाखल करण्याची प्रक्रिया होत आहे. नागरिकांनीही अशा बालकांबाबतची माहिती चाईल्ड लाईनला १०९८ या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी केले.