सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:09 AM2021-06-18T04:09:22+5:302021-06-18T04:09:22+5:30

कुऱ्हा : तिवसा तालुक्यातील भिवापूर येथील प्रमोद चव्हाण व त्यांच्या पत्नीला जबर मारहाण करण्यात आली व मोबाईल फोडून १० ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

कुऱ्हा : तिवसा तालुक्यातील भिवापूर येथील प्रमोद चव्हाण व त्यांच्या पत्नीला जबर मारहाण करण्यात आली व मोबाईल फोडून १० हजारांचे नुकसान करण्यात आले. शेतीच्या वादातून १४ जून रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी आरोपी मारोती राठोड, शेखर राठोड, अमोल राठोड (तिघेही रा. भिवापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

त्या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा

तिवसा : येथील हरिओम टायर्स शोरूममधून १४ जून रोजी २ लाख २४ हजार ९३९ रुपयांचे टायर लंपास करण्यात आले. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी रामभाऊ बोकडे यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------

वडिलांची शिवीगाळ मुलगी घरातून बेपत्ता

धामणगाव रेल्वे : घरगुती कामाच्या मुद्द्यावर वडिलांनी केलेली शिवीगाळ व मारहाण असह्य झालेल्या मुलीने घरून पलायन केले. ही घटना विटाळा येथे १३ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली. याप्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी १४ जून रोजी दुपारी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला.

-------------

काशीखेड येथील विवाहितेचा छळ

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील एका ३० वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी १४ जून रोजी दत्तापूर पोलिसांनी विवाहितेच्या तक्रारीवरून आरोपी संदीप जनार्दन रंगारी (३४, काशीखेड) याच्याविरुद्ध कलम ४९८ अ, ५०७ अन्वये गुन्हा दाखल केला.

--------------

बंद हॉटेलमधून कूलर लंपास

अंजनगाव सुर्जी : तालुक्यात अडगाव फाट्यावरील एका बंद हॉटेलमधून कूलर, रॅक व लोखंडी जाळी असा १६०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. १३ जून रोजी सायंकाळी ही घटना उघड झाली. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपी संगम इंगळे (अडगाव खाडे) व नवनाथ (रा.पांढरी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------

२३ वर्षीय विवाहितेचा छळ

नांदगाव खंडेश्वर : लग्नातील हुंड्याच्या पैशांवरून एका २३ वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आला. १ जुलै २०१८ ते १४ जून २०२१ दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी नांदगाव पोलिसांनी आरोपी आशिष गावंडे व तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------------

जैनपूर शिवारात शेताकऱ्याला मारहाण

येवदा : दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथील गजानन सौरीपगार यांना जैनपूर शिवारात मारहाण करण्यात आली. शेतात ट्रॅक्टर आणू नका, असे म्हटल्याने १४ जून रोजी हा वाद झाला. येवदा पोलिसांनी आरोपी मनीष कोरपे, बाळकृष्ण कोरपे, रामा गवळी, मनोज कोरपे, मनीष कोरपेचा मुलगा (सर्व रा. जैनपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ..................... रा. गवळी ............................ याच्या तक्रारीवरून गजानन सौरीपगार, गंगाधर सौरीपगार, जयकुमार सौरीपगार, गंगाधर सौरीपगारचा मुलगा व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

--------------------

लोखंडचोर रंगेहाथ पकडला

मोर्शी : येथील जयगुरूनगर येथील एका बांधकामस्थळाहून लोखंडी सलाख व लोखंडी जॅक असा दोन हजारांचा ऐवज चोरून नेताना संजय ठाकूर (४३, रा. गाडगेनगर, मोर्शी) याला रंगेहाथ पकडण्यात आले. १४ जून रोजी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. मोर्शी पोलिसांनी शहीद खान यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

----------------------

शहापूर शिवारातून कृषिसाहित्य लंपास

वरूड : तालुक्यातील शहापूर शिवारातून लोखंडी गर्डर, पाईप, सब्बल, कुऱ्हाड असा एकूण ५१०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. १३ जून रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी १४ जून रोजी अशोक कटोले यांनी तक्रार नोंदविली. वरूड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------

फोटो पी १५ शिंदी

रेल्वे फाटक ते धर्माळा रस्त्याचे काम निकृष्ट

शिंदी बु. : येथील गावातून टवलारकडे जाणाऱ्या रस्त्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत नुकतेच रेल्वे फाटक ते आठवडी बाजाराच्या धर्माळापर्यंत खडीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याची तक्रार ग्रामपंचायतीने ठरावानिशी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे केली आहे.

------------

ग्रामीण भागात पेरणीला वेग

भातकुली : तालुक्यात खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे, तर काहींनी मशागतीला अंतिम वेग दिला आहे. बियाणे पुरेशा पावसाअभावी वाया जाऊ नये, यासाठी शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कृषी विभागानेदेखील ८० ते १०० मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन केले आहे.

-----------------

महाआवास अभियान कालावधीत जिल्ह्यात अनेक कामे पूर्ण

अमरावती : ग्रामविकास विभागाने गतीने कामे करून २०० दिवसांचे महाआवास अभियान कोरोनाकाळातही यशस्वी केले. जिल्ह्यात ५०७९ लाभार्थींना जागा उपलब्ध करून देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य पुरस्कृत योजनेत २० हजार २७ लाभार्थींची घरकुले मंजूर करण्यात आली. अभियानकाळात अमरावती जिल्ह्यात ८५०० घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत.

-------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.