सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:11 AM2021-04-17T04:11:47+5:302021-04-17T04:11:47+5:30

ब्राम्हणवाडा थडी : लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यावसायिकांनी बांधकामाचे साहित्य चढ्या भावाने विक्री करणे सुरू केले आहे. त्याचा फटका सर्वसाधारण ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

ब्राम्हणवाडा थडी : लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यावसायिकांनी बांधकामाचे साहित्य चढ्या भावाने विक्री करणे सुरू केले आहे. त्याचा फटका सर्वसाधारण घरकुलधारकांना बसू लागला आहे. सिमेंट, रेती व लोखंडाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी घरबांधणी दिवास्वप्न ठरणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

-------------

परप्रांतातील रेतीलाही बंदी

धारणी : मेळघाटात परप्रांतातून येणाऱ्या गौण खनिजांवरसुद्धा बंदी आणली गेली आहे. यावर तोडगा काढण्यात शासन व प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे मेळघाटातील नव्या बांधकामावर मोठ्या प्रमाणात गदा आली आहे. बांधकाम करायचे कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. व्यावसायिकांनाही रेतीघाट लिलावाची प्रतीक्षा लागली आहे.

--------------

कृषिपंपांसाठी नवीन वीज जोडण्या केव्हा?

चांदूर बाजार : नवीन कृषिपंपांना वीज खांबापासून सर्व्हिस वायरद्वारे ३० मीटरपर्यंत एका महिन्यात, तर २०० मीटरपर्यंत एरियल, लघु दाब वीजवाहिनीद्वारे तीन महिन्यांत देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शेतकरी वर्ग हा नवीन वीज जोडणीपासून वंचित आहे. आश्वासनाची त्वरित पूर्तता करून वंचित शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्याची मागणी होत आहे.

--------------

वरूड तालुक्यात बोअर खोदले जातेच कसे?

वरूड : जिल्हाधिकाऱ्यांनी बोअर करणाऱ्या रिंग माउंटेड मशीनवर बंदी घातली असताना, त्या मशीन येऊन बोअर करून जातात. तालुक्यात कोरोना वेगाने फैलावत असताना, अधिकारी व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन काही दलाल अधिक रक्कम घेऊन अवैध बोअर करून देत आहेत. काही भागात भरदिवसा बोअर केले जात आहेत.

---------------

करजगावातील चौकात खुले रोहित्र

करजगाव : येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला लागून आझाद चौकात खुले रोहित्र आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक बळावली आहे. महावितरणला आणखी प्राणांतिक अपघाताची प्रतीक्षा आहे का, असा संतप्त सवाल करजगाववासीयांनी उपस्थित केला आहे. येथे काही दिवसांपूर्वीच या रोहित्राला आग लागली होती.

---------------

चिखलदरा तालुक्याला पाणीटंचाईचा फटका

चिखलदरा : तालुक्यातील ३५ पेक्षा अधिक पाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना आणि विविध उपक्रम राबविले जात असतात. मात्र, या ३५ गावांतील पाणीटंचाई ‘जैसे थे’ आहे. अनेक गावांत टँकरवारी सुरू झाली आहे.

---------------

कोरोना लॉकडाऊनमुळे वधुपिता चिंतेत

नांदगाव खंडेश्वर : राज्यात संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी जाहीर झाल्याने सर्व लग्न सोहळ्यात अडचणी आल्या आहेत, तर ग्रामीणमध्ये काही ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. ज्यांच्या लग्नाची तारीख जवळ जवळ येत आहे अशांची संपूर्ण तयारी केली असताना, वर-वधुकडील मंडळी ऐनवेळी लागलेल्या बंदीने चिंतेत आहेत.

---------------

राष्ट्रीय महामार्ग की गॅरेज?

चांदूर बाजार : शहरातील शिरजगाव बंड, जमापूर या भागात राष्ट्रीय महामार्गावर उघड्यावरच गाड्या दुरुस्तीचे गॅरेज, फळविक्रीची दुकाने उभारण्यात आली आहेत. यात सर्वाधिक दुकाने वाहने दुरुस्तीची आहेत. मोठी वाहने मुख्य रस्त्यावरच उभी करून दुरुस्तीची कामे केली जातात. महामार्ग पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

----------------

अचलपूर शहराचे आरोग्य धोक्यात

अचलपूर : शहरातील गटारांची, नाल्यांची योग्य पद्धतीने स्वच्छता नाही. नगरपालिका यंत्रणेकडून परिणामकारक फवारणी व धूरळणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐतिहासिक अचलपूर शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत.

-----------

चांदूर बाजार तालुक्यात अवैध रेती उत्खनन

करजगाव : वाळू माफियांनी तालुक्यातील नद्यांचे उदर पोखरले आहे. रोज रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक केली जाते. एक ब्रास रेती ७ हजार ५०० रुपयांना विकली जाते. चांदूर बाजार तालुक्यातील रेतीघाटाचे लिलाव झाले नसताना, नदीपात्रातील वाळूचा अवैध उपसा चर्चेचा विषय बनला आहे. महसूल यंत्रणा गप्प आहे.

-------------------

ग्रामपंचायत सदस्य मानधनाविना

चांदूररेल्वे : महानगरपालिका, नगरपरिषद शेत्रातील सदस्यांना वाढीव मानधन देण्यात येते. त्यांना रहिवासी, परिचय दाखला देण्याची मुभा आहे. परंतु, ग्रामपंचायत सदस्यांना अशाप्रकारचे कोणतेच अधिकार नाही. ७३ व्या घटना दुरुस्तीत ग्रामीण भागाचा विकास झाला. केंद्र शासनाने ग्रामपंचायतींना अधिकारसुद्धा दिले. आता ग्रामपंचायत सदस्यांकडे सकारात्मक भूमिकेने पाहावे, असे मत सदस्यांनी व्यक्त केले आहे.

-----------------

घरकुल मार्टच्या माध्यमातून बांधकाम साहित्य

अमरावती: घरकुल मार्टच्या माध्यमातून विटा, सिमेंट, गिट्टी, लोखंड, वाळू, टिनपत्रे, शौचालय शीट, दरवाजाची फ्रेम, खिडकी असे अत्यावश्यक बांधकाम साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. घरकुल मार्टद्वारे अल्प नफा घेऊन साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे लाभार्थींचीही सोय झाली आहे.

---------------------

उसाच्या रसावर भर, शीतपेयांची मागणी वाढली

भातकुली : एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात तापमानामध्ये वाढ झाल्याने जिवाची लाही-लाही होत आहे. परिणामी, शीतपेयांच्या दुकानावर गर्दी दिसून येत आहे. तापमानात वाढ झाल्याने जिवाला थंड करण्यासाठी अनेक नागरी शीतपेयांच्या दुकानावर जात आहे. बहुतांश जण उसाच्या रसाला पसंती देत आहेत.

-------------

परीक्षा केंद्रावरील शिक्षकांच्या लसीकरणाची मागणी

अमरावती : राज्यात दहावी-बारावी परीक्षेच्या कामकाजात असणाऱ्या शिक्षक-कर्मचाऱ्यांना लसीकरणाची तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. येत्या काही दिवसांत लस मिळाल्यास बरे होईल, असे शिक्षकांनी सांगितले. या शिक्षकांना कोविड तपासणी बंधनकारक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

----------------

यंदाही उन्हाळी शिबिरे लॉकडाऊन

अमरावती : कोरोना लॉकडाऊनमध्ये कोचिंग क्लासवर बंदी घालण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालयेदेखील बंद आहेत. कोरोनाने डोके वर काढल्याने यंदाही कार्यशाळा आणि शिबिर ऑनलाइन होण्याची संकेत आहेत. त्यामुळे बच्चेकंपनी पुन्हा घरबंद झाली आहेत. ती हिरमुसली आहेत.

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.