सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:13 AM2021-04-21T04:13:17+5:302021-04-21T04:13:17+5:30

दिव्यांगांना बनावट प्रमाणपत्र मिळते स्वस्तात अमरावती : दिव्यांग बांधवांना बनावट प्रमाणपत्र देऊन त्यांची फसवणूक करणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय आहे. ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

दिव्यांगांना बनावट प्रमाणपत्र मिळते स्वस्तात

अमरावती : दिव्यांग बांधवांना बनावट प्रमाणपत्र देऊन त्यांची फसवणूक करणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय आहे. दिव्यांग बांधवांनी अशा दलालांपासून सावध राहावे व त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी केले आहे. तिवसा पोलीस ठाण्याकडून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला पत्र प्राप्त झाले होते. ही प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले.

---------------

मृग बहाराच्या नुकसानभरपाई केव्हा?

अमरावती: १४ तालुक्यांपैकी १० तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. यात सर्वाधिक नुकसान संत्रा मृग बहाराचे झाल्याचा अहवाल आहे. १० तालुक्यातील एकूण ११ हजार ६८८ हेक्टर क्षेत्रावरील मृग बहार गळाला. यात सर्वाधिक ५१२७ हेक्टर क्षेत्र चांदूरबाजार तालुक्यातील आहे. त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

-------------------

मोर्शी तालुक्यातील गावांना कोरड

मोर्शी : तालुक्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरने सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी स्थानिक विकास निधीअंतर्गत हिवरखेड, रिद्धपूर, अंबाडा, पिंपळखुटा (मोठा), आष्टोली, धानोरा, तरोडा या ७ गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर वाटप करण्यात आले.

--------------

कुऱ्हा बसथांब्यावर मुत्रीघराची आवश्यकता

कुऱ्हा : येथील बसस्टॉपवरील मुत्रीघराची पुरती दुरवस्था झाली असून, त्या ठिकाणी प्रचंड घाण साचली आहे. त्यामुळे महिला प्रवासीवर्गाची मोठी कुचंबना होत आहे, तर पुरुष मुत्रीघर दगड, माती व इतर घाणीने बुजलेले आहे. पुरुष मुत्रीघराच्या तोंडाशी लघुशंका उरकतात.

------------

धामणगावातील ४,१०७ घरकुलांना मंजुरी

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील २ हजार ५०० घरकुलांचे काम मार्च महिना संपण्यापूर्वी सुरू व्हावे, यासाठी ६२ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासनाची वारी घरकुल लाभार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला. धामणगाव तालुक्यात ४ हजार १०७ घरकुलाना मंजुरी मिळाली होती. यातील काही घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत.

-------------------

३०० वीटभट्टीचालकांना हवा मदतीचा हात

अंजनगाव बारी : परिसरात ३०० वीटभट्टया कारखानदार आहेत. अवकाळी पावसामुळे तयार झालेला ७० ते ८० लाखांचा कच्चा माल वाया गेला आहे. लावलेल्या भट्टीतील प्रत्येक कारखानदाराचा एक ते दीड लाख एवढा माल निरूपयोगी झाला आहे. हा माल झाकलेला असतानाही उपलब्ध सामग्री फाटल्याने व उडाल्याने मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

-------------------------

लॉकडाऊन काळातही कर्जासाठी तगादा

वरूड : लॉकडाऊन काळात अनेक बँका, पतसंस्थांनी कर्जदारांना त्राहीमाम केले आहे. कर्ज वसुली पथके थेट घरापर्यंत पोहोचत आहेत. शेतकरी, दुकानदार, व्यापारी यामुळे त्रस्त झाले आहेत. बँका, पतसंस्थांचा तगादा वाढल्याने कर्जदार विमनस्क अवस्थेत आला आहे.

-------------

ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय

ंंवनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गरजधरी येथून होत असलेल्या गौण खनिजाच्या वाहतुकीमुळे गरजधरी, दहीगाव रेचा, अंजनगाव सुर्जी हास मार्ग खड्ड्यात गेला आहे. अनेक दिवसांपासून गरजधरी येथून एका शेतातून गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. यामुळे गरजधरीसह दहीगाव रेचा येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.

------------------

महिलांनी गिरविले मिरची लागवडीचे धडे

वरूड : तालुक्यातील राजुरा बाजार येथील बचत गटाच्या महिलांनी मिरची उत्पादनाचे धडे गिरविले. पुढील वर्षी मंगलमूर्ती बचत गट हा मिरचीची लागवड करणार आहे. प्रेरणा लोक संचालित साधन केंद्र जरूडअंतर्गत येथील बचत गटातील महिलांनी योगेश नारायण भोंडे यांच्या शेतात मिरची उत्पादनाचे धडे गिरविले.

-------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.