सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:14 AM2021-04-23T04:14:16+5:302021-04-23T04:14:16+5:30

अचलपूर : येथील नशिबपुरा भागातील गोठ्यातून ३६०० रुपये किमतीचे शेतीपयोगी साहित्य लंपास करण्यात आले. याप्रकरणी विजय दंडारे यांच्या तक्रारीवरून ...

Summary news | सारांश बातम्या

सारांश बातम्या

Next

अचलपूर : येथील नशिबपुरा भागातील गोठ्यातून ३६०० रुपये किमतीचे शेतीपयोगी साहित्य लंपास करण्यात आले. याप्रकरणी विजय दंडारे यांच्या तक्रारीवरून सरमसपुरा पोलिसांनी दोन अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

चिंचोली येथे तरुणाला मारहाण

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील चिंचोली येथील सुभाष पारिसे (३३) याला लोखंडी रॉड व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. उधारी देत नाही, म्हणून बदनामी करतो का, अशी विचारणा करत ही घटना घडली. मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी याप्रकरणी विशाल बमनोटे (३३) व प्रफुल्ल बमनोटे यांचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------

कोरोनामुळे गावगाडा ठप्प

अंजनसिंगी : ग्रामीण भागात प्रतीदिन शंभर रुपये मजुरी असणाऱ्या पती-पत्नीला केवळ महिन्यातून २५ दिवस मजुरी मिळत आहे. महिनाकाठी त्यातून कसेबसे ४ हजार पदरात पडतात. मुलाबाळासाठी वर्षातून एकदाच कपडे घ्यावे लागतात. मात्र कोरोनामुळे त्याला मर्यादा आली आहे. हाताला काम उरलेले नाही.

-----------

धारणी शहराची अतिक्रमणातून मुक्तता केव्हा?

धारणी : येथील अनेक चौकाला अतिक्रमणाने विळखा घातला आहे. दयाराम चौकाला चारही बाजूने वेढले गेले आहे. दयाराम चौकातील अतिक्रमण हटविण्यास प्राधान्य द्यायला हवे, अशी धारणीकरांची अपेक्षा आहे. नगरपंचायत व उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यासाठी संयुक्त मोहीम हाती घ्यावी, अशी अपेक्षा आहे.

-------------

ग्रामीण भागातही कोरोना संख्या वाढतीच

अचलपूर : तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. ग्रामीण भागातील कांडली, देवमाळी, पथ्रोट, नारायणपूर, वडगाव फत्तेपूर, उपतखेडा, गौरखेडाकुंभी, नवसारी, जवर्डी, रामापूर, रासेगाव, परसापूर, खानजमानगरसह तालुक्यात कमी अधिक प्रमाणात हे कोरोनारुग्ण आढळून येत आहेत. मात्र आरोग्य यंत्रणेला मर्यादा आली आहे.

------------------

अंजनगाव बारी - बडनेरा मार्गाची दुरवस्था

अंजनगाव बारी : येथून रायसोनी विद्यापीठ ते राम मेघे इंजिनिअरिंग कॉलेज ते पुढे जुनी वस्ती बडनेरा हा मार्ग पूर्णपणे खराब झालेला आहे. या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवासी, व्यापारी, शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

--------------

आदिवासी विकास योजना रखडली

जरूड : वरूड तालुक्यात ठक्कर बाप्पा आदिवासी सुधार योजना २०१९ - २० अंतर्गत म्हाडा मिनी म्हाडामध्ये समावेश असलेल्या आदिवासी गावामध्ये लाखो रुपयांची कामे निकृष्ट झाल्याची ओरड आहे. अधिकारी आणि ठेकेदारांचे संगनमताने कामे केल्या जात असून कमिशनच्या ओझ्याखाली कामाची प्रतवारी घसरली आहे.

-------

तळेगाव दशासर ग्रामस्थांना मुबलक पाणी केव्हा?

तळेगाव दशासर : येथे पाणीपुरवठा करण्यासाठी सन २०१३ मध्ये २ कोटी रुपयांच्या पेयजल पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली होती. मात्र आठ वर्षांनंतरही ती पूर्णत्वास गेलेली नाही. गावात राबविलेल्या पाणीपुरवठा नळ योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. अर्ध्या गावाला जुन्या योजनेद्वारे पाणीपुरवठा होत असून इतरांना खासगी बोअरचा आधार घेऊन तहान भागवावी लागत आहे.

---------------

मजीप्राने खोदून ठेवले रस्ते

मंगरूळ दस्तगीर : पाणीपुरवठा योजनेसाठी गावातील सर्व रस्ते खोदून ठेवण्यात आले. त्यामुळे हे गाव त्या खोदकामामुळे भकास झाले आहे. जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड आहे. या गावातील रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने किरकोळ अपघात देखील वाढले आहेत.

-------------------

Web Title: Summary news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.