सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:11 AM2021-04-25T04:11:39+5:302021-04-25T04:11:39+5:30
धारणी : तालुक्यातील दादरा येथील तुकाराम शिंदे (६०) यांना मारहाण करण्यात आली. २१ एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. ...
धारणी : तालुक्यातील दादरा येथील तुकाराम शिंदे (६०) यांना मारहाण करण्यात आली. २१ एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. शिवीगाळ करत असताना समजावण्यास गेला असता, हा प्रकार घडला. धारणी पोलिसांनी याप्रकरणी उत्तम सूर्यवंशी (दादरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------------
पंचायत समितीतून संगणक चोरीला
चिखलदरा : येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या खोलीतून जुना संगणक चोरीला गेला. २ ते ३ मार्चच्या दरम्यान ही घटना घडली. चिखलदरा पोलिसांनी याप्रकरणी तेजस तंबाखे यांच्या तक्रारीवरून २२ एप्रिल रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
--------
रेती सांडवून ट्रॅक्टर पळाला
चांदूर बाजार : महसूल व पोलीस पथकाला पाहताच ट्रॉलीतील रेती रस्त्यावर खाली करीत चालकाने ट्रॅक्टर-ट्रॉली पळविली. येथील बाजार समितीजवळ २२ एप्रिल रोजी दुपारी हा प्रकार घडला. तलाठी सुधाकर खंडारे यांच्या तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी आरोपी अजय मानकर (रा. चांदूर बाजार) व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
----------------
बारगाव शिवारातून गाई पळविल्या
बेनोडा: वरूड तालुक्यातील बारगाव शिवारातून २५ हजार रुपये किमतीच्या दोन गाई लंपास करण्यात आल्या. २१ ते २२ एप्रिलच्या दरम्यान ही घटना घडली. श्रीधर सोलव यांच्या तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
----------------
पुसला येथे महिलेला मारहाण
पुसला : येथील वाॅर्ड क्रमांक ५ मधील एका ५० वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली तसेच तिच्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी देण्यात आली. २२ एप्रिल रोजी सकाळी ही घटना घडली. शेंदूरजनाघाट पोलिसांनी आरोपी कमलाकर अहेर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
----------------
तळणी शिवारात तरुणाला मारहाण
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळणी शिवारात संतोष कराळे (२१, रा. निंभोरा बोडखा) याला मारहाण करण्यात आली. २२ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी मंगरूळ पोलिसांनी आरोपी नीलेश चवरे (३०, रा. निंभोरा बोडखा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---------------
स्प्रिंकलर पाईप जाळले
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील कोदोरी हरक शिवारातील २० हजार रुपये किमतीचे पाईप जाळण्यात आले. २१ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी शेख साजिद शेख नाजर (३५, रा. कंझरा) यांच्या तक्रारीवरून आरोपी शेतमालक अनिल नामदेवराव दहाडे (रा. कंझरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने त्याच्या शेतातील धुऱ्यावर ठेवलेली पऱ्हाटीची धस्कटे पेटविली. ती आग पसरत शेख साजिद यांच्या शेतात पोहोचली.
---------------
रिद्धपूर येथे लाभार्थींना धनादेशाचे वितरण
रिद्धपूर : राष्ट्रीय अर्थसाहाय्य योजनेंतर्गत रिद्धपूर येथील निवड झालेल्या पात्र लाभार्थींना २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. सरपंच गोपाल जामठे, ग्रामपंचायत सदस्य सचिन डवके व प्रवीण जावरकर, सतापे तलाठी, कोतवाल संजय जामठे उपस्थित होते.
--------------
कुऱ्हा ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण
कुऱ्हा : स्थानिक ग्रामपंचायत परिसरात वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सुरेश वसुले, बाळू इंगळे, पंकज पचगाडे, अमोल ठाकरे, सूरज माथूरकर, शैलेश डहाके तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संदीप तिंतुलकर, शेख रफीक, सुरेश सपाटे, रवि कोठिया आदी उपस्थित होते.
------------
मारडा येथे कांदा काढणीला सुरुवात
कुऱ्हा : तिवसा तालुक्यातील मारडा या गावामध्ये कांदा काढणी जोमाने सुरू झाली आहे. यंदा फेब्रुवारी व एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आल्यामुळे कांदा पिकात घट आल्याचे मारडा गावातील शेतकरी सांगतात. मारडा गाव अलीकडे कांद्याचे आगर म्हणून प्रसिद्धीस आले आहे.
-----------------
हॉस्पिटलच्या प्रस्तावित आयसीयूसाठी दिला निधी
अमरावती : कारंजा लाड येथील के. एन. महाविद्यालयाचे दिवंगत प्राध्यापक सुधाकर नाफडे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी निर्मला नाफडे आणि कुटुंबाने जनकल्याण सेवा संस्था संचालित डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या प्रस्तावित भाराणी आयसीयूसाठी एक लाख रुपयांची देणगी प्रदान केली.
----------------
एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल
अमरावती : आदिवासी विदयार्थ्यांकरिता कार्यरत राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्यावतीने एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स (ईएमआरएस) करिता प्राचार्य, उपप्राचार्य पीजीटी व टीजीटीच्या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज ३० एप्रिलपर्यंत मागविण्यात आले आहेत.
-----------