सारांश बातम्या (पान २)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:13 AM2021-04-09T04:13:01+5:302021-04-09T04:13:01+5:30

वरूड : संत्र्यांवर प्रक्रिया करून विविध उत्पादने निर्माण करणारा प्रकल्प उभारल्यास पुन्हा संत्र्याला सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. ...

Summary News (Page 2) | सारांश बातम्या (पान २)

सारांश बातम्या (पान २)

Next

वरूड : संत्र्यांवर प्रक्रिया करून विविध उत्पादने निर्माण करणारा प्रकल्प उभारल्यास पुन्हा संत्र्याला सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. मात्र, याकरिता राजाश्रय मिळणे गरजेचे आहे. संत्र्यामुळे सोन्याची अंडी देणारा तालुका म्हणून वरूडचा नावलौकिक आहे. संत्र्याचे बंपर उत्पादन काढणारा वरूड तालुका आता कोरडाठक पडला आहे.

----------------------

वरूड - पुसला रस्ता अर्धवट स्थितीत

पुसला : येथे वनजमिनीचा मुद्दा पुढे आल्याने पुसला येथून वरुडकडे येताना एक किमी अंतराचा रस्ता अर्धवट बांधकामामुळे नाल्यासुद्धा जैसे थेच आहेत. अर्धवट रस्त्यामुळे अनेकवेळा अपघात घडले, तर अनेकांना प्राणाससुद्धा मुकावे लागले. यामुळे सदर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे तसेच पुसला येथे गतिरोधक लावण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

----------------

मंगल कार्यालये, लॉन बंदच

चांदूर बाजार : लॉकडाऊनचा फटका मंगलकार्यालये, लॉन तसेच संलग्न असलेल्या व्यावसायिकांना बसला आहे. ऐन लग्नसराईच्या वेळीच व्यवसाय बंद झाल्याने जिल्ह्यातील हजारो कुटुंबांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली आहे. यामुळे परवानगी नसलेले मंगलकार्यालये व लॉन लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी चांदूर बाजार तालुक्यातील व्यावसायिकांनी केली आहे.

------------

संत्रा उत्पादकांना हवे फवारणीचे औषध

शेंदूरजनाघाट : सन २०२०-२१ मध्ये झालेल्या अतिपावसामुळे संत्राझाडांची मोठ्या प्रमाणात पानगळ झाली. फक्त शेंड्यावरील पानेच शिल्लक राहिली. त्याचा परिणाम संत्राफुटीवर झाला. संत्र्याला कमी प्रमाणात फळधारणा झाल्यामुळे शेतकरी अडचणीत असून, कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी फवारणी औषध अनुदानावर वाटप करावी, अशी मागणी येथील संत्रा उत्पादकांनी केली आहे.

-------------

वरूड तालुक्यात बोअरचा सपाटा

जरूड : वरूड तालुक्यातील भूजल पातळी खालावल्याने सन २००२ पासून वरूड व मोर्शी तालुका ड्राय झोन क्षेत्र घोषित आहे. त्यामुळे नवीन बोअर, विहिरी करण्यावर बंदी घालण्यात आली. नोव्हेंबर २०१९ पासून जिल्हाधिकाऱ्यांनी वरूड आणि प्रतिबंधित क्षेत्रात रिंग माउंटेड बोअर मशीनला बंदी घातली. मात्र, तालुक्यातील काही दलाल बोअरचे रकमेपेक्षा ५० हजार रुपये अधिक घेऊन बोअर करून देत आहेत.

-------------

बहिरम घाट सिंचन तलावाची दुरुस्ती

चांदूरबाजार : तालुक्यातील श्रीक्षेत्र बहिरम येथील बहिरमबाबा मंदिराच्या मागील बाजूस पायथ्याशी असलेल्या बहिरमघाट सिंचन तलावाच्या दुरुस्तीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या सिंचन तलावासोबतच विश्रोळी आणि मोझरी सिंचन तलावाचीही दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न काहीअंशी सुटणार आहे.

--------

अंजनगाव पालिकेला पथदिव्यांबाबत मर्यादा

अंजनगाव सुर्जी : नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार नगरपरिषदेला नवीन पथदिवे विकत घेण्याची मुभा नसल्याने पालिकेचे घोडे अडले आहे. ईईसीएलने लावलेल्या पथदिव्यांची पालिकेला दुरुस्ती करता येत नसल्याने पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांसमोर मोठा पेच उभा ठाकला आहे. ते पथदिवे गेल्या कित्येक दिवसांपासून बंद आहेत.

-------------------

वरूड तालुक्यातील विद्युत रोहित्र कूचकामी

वरूड : तालुक्यातील बेलोरा येथे पळसवाडा ते बेलोरा या पांदण रस्त्याच्या मधोमध असलेल्या विद्युत डीबीकडे महावितरण कंपनीचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने या विद्युत रोहित्रापासून धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सिंचन देखील प्रभावित झाले आहे.

-----------------------------

जीवघेणे खड्डे अपघाताला निमंत्रण

पुसला : नव्याने तयार करण्यात आलेल्या अमरावती पांढुर्णा महामार्गावर जीवघेणे खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी त्यासाठी आंदोलन केले. आता पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

-------------------------

चांदूर बाजार शहरात कचरा संकलन कागदावरच

चांदूर बाजार : शहरात नगरपालिकेद्वारा प्रत्येक प्रभागात नियमित घंटागाडी फिरत असल्याचा दावा केला जातो. मात्र, शहरातील मुख्य चौक, बसस्थानक, पोलीस ठाणे, बाजार समिती व मुख्य बाजारपेठेत विखुरलेला कचरा पाहता पालिकेकडून होणारे कचरा संकलन कागदावरच असल्याची ओरड आहे.

---------------------------

रेती तस्करांना अभय कुणाचे?

तळेगाव दशासर : परिसरातील नदी-नाल्यातून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैधरीत्या उत्खनन सुरू करण्यात आले आहे. घुईखेड मार्गावरील नाल्यामधून दिवस - रात्र बैलबंडीने राजरोसपणे रेती उत्खनन केले जात आहे. दररोज १५ ते २० बैलबंडीचा यासाठी वापर होत आहे. हायवेवरून बसस्टॅन्डमार्गे या बैलबंडी रेतीसहित गावात शिरतात.

------------

शिक्षक-कर्मचाऱ्यांचे लसीकरण करा

अमरावती : राज्यात दहावी-बारावी परीक्षेच्या कामकाजात असणाºया शिक्षक-कर्मचाºयांना लसीकरणाची तातडीने सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. येत्या काही दिवसात लस मिळाल्यास, दुसरा डोस देखील परीक्षा संपेपर्यंत पूर्ण होईल, असे शिक्षकांनी सांगितले.

----------------

यंदाही बुडाले उन्हाळी शिबिरे

भातकुली : कोरोनाचा कहर कमी जाणवायला लागल्यावर शाळा आणि क्लास सुरू झाल्याने मे महिन्यामध्ये प्रत्यक्ष घराबाहेर जाऊन कार्यशाळा, शिबिरे अनुभवता येतील, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढल्याने यंदाही ऑनलाइन कार्यशाळा आणि शिबिरांवरच भर देण्यात येईल, अशी चिन्हे आहेत.

---------------------

परीक्षार्थिंना अ‍ॅडमिट कार्डची प्रतीक्षा

अमरावती : जेईई मेनच्या तिसऱ्या सत्राची म्हणजेच एप्रिलची जेईई मेन परीक्षा २७, २८, २९ आणि ३० एप्रिल रोजी होणार आहे. एप्रिल सत्राची जेईई मेन परीक्षा पेपर-1 (बीई/बीटेक) साठी आयोजित केली जाईल. परीक्षेत सहभागी होणाºया उमेदवारांचे अ‍ॅडमिट कार्ड काही दिवसात जारी केले जातील. मात्र कोणत्या दिवशी अ‍ॅडमिट कार्ड मिळतील त्याची निश्चित तारीख अद्याप एनटीएकडून जारी करण्यात आलेली नाही.

------------

माळीपुºयात तरूणाला मारहाण

चांदूरबाजार: येथील माळीपुरा भागात महेश मांडळे (३३) याला मारहाण करण्यात आली. ५ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी चांदूरबाजार पोलिसांनी आरोपी गिरिश गोपाळराव खोडे (रा. माळीपुरा) याचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

------

कोविड रुग्णालयात ग्रामगीता प्रवचन

अमरावती : येथील कोविड हॉस्पिटलमध्ये ग्रामगीता प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी रुग्णांमार्फतच ग्रामगीता प्रवचनाचे वाचन करण्यात आले. करोनाकाळात सकारात्मकता प्रदान करण्यासाठी ग्रामगीता ग्रंथाचे वाचन केले. आयुष्यात येणाºया संकटांवर सकारात्मकतेने मात कशी करावी, असा संदेश या ग्रामगीता प्रवचनातून देण्यात आला.

-------------------

वाढत्या उन्हामुळे लिंबे महाग

अमरावती : उन्हाचा तडाख्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लिंबांच्या मागणीत वाढ झाली आहे. एरवी घाऊक बाजारात लिंबांच्या एका गोणीची विक्री १०० ते १४० रुपये दराने केली जाते. तर सध्या मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात लिंबांची एका गोणीची (आकारमानानुसार ३५० ते ५५० लिंबे) विक्री एक ते दीड हजार रुपये या दराने केली जात आहे. किरकोळ बाजारात पाच रूपयाला एक लिंबू दिले जाते.

------------

Web Title: Summary News (Page 2)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.