उन्हाची दाहकता वाढल्याने बाजारपेठेत फळांची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:12 AM2021-04-27T04:12:38+5:302021-04-27T04:12:38+5:30
चांदूर बाजार : तुलनेने यंदा तीव्र स्वरूपाचा उन्हाळा जाणवत आहे. यावर्षी अनेक भागांत एप्रिल महिन्यापासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ...
चांदूर बाजार : तुलनेने यंदा तीव्र स्वरूपाचा उन्हाळा जाणवत आहे. यावर्षी अनेक भागांत एप्रिल महिन्यापासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. उन्हाची दाहकता वाढली असल्याने बाजारपेठेत विविध फळांची मागणी वाढली आहे. मागणीला पाहता निरनिराळे रसदार फळे बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे.
नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शीतपेयांचा वापर करताना दिसत आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी बाजारपेठेत विविध फळांची मागणी वाढली आहे. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वाधिक मागणी टरबूजची होत आहे. यंदा टरबूजची विक्री प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने होत आहे. तालुक्यात टरबुजाची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर देखील दिवसेंंदिवस ढासळत आहे. यासोबतच द्राक्ष, चिकू, खरबूज, नारळ पाणी, आदींना मागणी आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने बाजारपेठ केवळ ४ तास सुरू आहे. अशात शीतपेयांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. याचसोबत आईस्क्रीम, बदाम, काजू शेक यांच्या विक्रीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. या शीतपेयाचे दर प्रचंड वाढले असले तरी मागणी मात्र कमी झालेली नाही. तापमान दिवसेंदीवस वाढत असल्याने शीतपेयांची मागणी मोठी वाढत आहे. मात्र, लॉकडाऊनचा फटका शीतपेयांच्या दुकानांना बसला असल्याने फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
यंदा एप्रिलच्या सुरुवातीपासून उन्हाची दाहकता वाढल्याने एप्रिलपेक्षा मे महिन्यात परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात भरीस भर म्हणून पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस घडद होत आहे. ग्रामीण भागात विहिरींची पाणी पातळी खोल गेली आहे. त्याचबरोबर बोरवेलचे पाणी क्षारयुक्त असल्यामुळे या पाण्याची मागणी कमी असते.
गरीब गरिबांचे फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ देखील बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे. अशात उन्हापासून बचाव करण्यासाठी पाण्यासोबत थंडपेयाकडे नागरिकांची पावले वळली आहे. त्यामुळे फळांची मागणी मोठी वाढली आहे.
लॉकडाऊनमुळे यंदा रसवंतीचा व्यवसाय बंद आहे. यात ऊसाची वाहतूक बंद असल्याने रसवंती संचालकांनी ऊसाच्या रसाचे दर कमी ठेवले आहे. उन्हाळ्यात मात्र चहापेक्षा ऊसाचा रस बरा असे म्हनणाऱ्या ग्राहकांना यंदा ऊसाच्या रसाला मुकावे लागणार आहे. मात्र, लिंबू सरबतच्या गाड्यांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.