रविवारी चार लाख भक्तांनी घेतले बहिरम बुवाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:15 PM2019-01-14T23:15:56+5:302019-01-14T23:16:11+5:30
बहिरम यात्रेचा २० डिसेंबर रोजी शुभारंभ झाला. पौष महिन्यात यात्रेत भक्तांची अलोट गर्दी असते. याचा प्रत्यक्ष अनुभव पोलीस प्रशासन यावर्षीही अनुभवत आहे. १३ जानेवारीच्या रविवारी तब्बल ४ लाख भाविकांनी बहिरमबुवाचे दर्शन घेतल्याची अधिकृत माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. रविवारची गर्दी वगळता आठ दिवसांपासून यात्रेत रोज ८० हजार ते एक लाख भक्त बहिरममध्ये येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : बहिरम यात्रेचा २० डिसेंबर रोजी शुभारंभ झाला. पौष महिन्यात यात्रेत भक्तांची अलोट गर्दी असते. याचा प्रत्यक्ष अनुभव पोलीस प्रशासन यावर्षीही अनुभवत आहे. १३ जानेवारीच्या रविवारी तब्बल ४ लाख भाविकांनी बहिरमबुवाचे दर्शन घेतल्याची अधिकृत माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. रविवारची गर्दी वगळता आठ दिवसांपासून यात्रेत रोज ८० हजार ते एक लाख भक्त बहिरममध्ये येत आहेत.
रविवारी सुटीचा आनंद घेत यात्रेत परिवारासोबत बहिराम बाबाचे नवस फेडण्याकरिता अनेक कुटुंब सकाळपासूनच पोहचले होते. यात्रेत रोडगे व हंडीमटनाच्या मेजवानीकरिता ठिकठिकाणी शामियाने, राहुट्या उभारल्या होत्या. दर्शनाकरिता नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान दिवसभर मौज मजा केल्यानंतर दुपारी ४ च्या सुमारास बहिरम चांदूर बाजार मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. ३० ते ४० मिनिटांनंतर ही वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाने रिंगन सोहळा व २६ जानेवारीच्या सुटी दरम्यान यात्रेत वाहतूक, कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांतर्फे वर्तविले जात आहे. बहिरम यात्रा दरम्यान कायदा, सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यावर आहे. येथील ठाणेदार मुकुंद कवाडे,पीएसआय सुबोध वंजारी, राजू इंगळे, सोळंकेसह ७५ कर्मचारी व्यवस्था सांभाळत आहे.
बहिरम यात्रेत रविवारी भाविकांची संख्या पाहता, कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवले जात आहे. येत्या रिंगण सोहळ्याला तसेच २६ व २७ जानेवारीला यात्रेकरूंची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.
- मुकुंद कवाडे, ठाणेदार, शिरजगाव कसबा