दारू दुकानापुढेच "सुंदरकांड"
By admin | Published: April 23, 2017 12:21 AM2017-04-23T00:21:44+5:302017-04-23T00:21:44+5:30
मद्यपींच्या त्रासाला कंटाळलेल्या विवेकानंद कॉलनी वासींयांनी दारू दुकान हटविण्यासाठी देव हनुमानाला साकडे घातले.
अभिनव आंदोलन : मद्यपींच्या त्रासाला कंटाळले नागरिक
अमरावती : मद्यपींच्या त्रासाला कंटाळलेल्या विवेकानंद कॉलनी वासींयांनी दारू दुकान हटविण्यासाठी देव हनुमानाला साकडे घातले. शनिवारी विवेकानंद कॉलनीतील रहिवाश्यांनी दारू दुकानासमोरच "सुंदरकांड" या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून दारू दुकान हटविण्यासंदर्भात असा आगळा वेगळा विरोध नागरिकांनी विरोध केला.
सुप्रीम कोटाने दिलेल्या मद्यविक्रीच्या निर्णयाचे अमरावतीकरांनी स्वागत केले. मात्र, महामार्गावरील सर्वच दुकाने बंद झाल्याने मद्यपींनीअंतर्गत मार्गावरील मद्यविक्री केंद्रावर धाव घेतली. परिणामी अंतर्गत मार्गावरील मद्यविक्री प्रतिष्ठानावर गर्दी वाढली. त्यामुळे अंतर्गत परिसरातील नागरिकांना त्रास सुरु झाला. असाच प्रकार विवेकानंद कॉलनीत घडला. परिसरातील वाईन अॅन्ड वाईन या दारू दुकानाजवळील रहिवाशांना मद्यपींचा त्रास सुरू झाला. सकाळी दुकान उघडल्यापासून तर रात्री ११ वाजता दुकान बंद होईपर्यंत दारु दुकानावर मद्यपींची वर्दळ सुरु होते. दारु दुकानात येणारे ग्राहक त्यांची वाहने अस्तव्यस्त स्थितीत ठेवत असल्यामुळे नागरिकांना ये-जा करणेही कठीण झाले. त्यातच वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन कर्कश हार्नमुळे नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे. दररोज मद्यपींचे वादविवाद, आरडाओरड, हाणामारीच्या प्रसंगाने नागरिकांची शांतता भंग झाली. दारू पिऊन उलट्या करणे, प्लास्टिकचे ग्लास फेकून घाण करणे, असे प्रकार नागरिकांना सोसावे लागत आहे. या परिसरात तीन मंदिर आहेत. नामांकित डॉक्टरांचे हॉस्पिटल्स आहेत. स्कूल बसेसचे आवागमन सुरू असते. असे प्रकार घडत असताना प्रशासनकडून मद्यविक्रेत्यालाच सरंक्षण दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शनिवारी सकाळी नागरिकांनी "सुंदर कांड" या धार्मिक कार्यक्रमातून प्रशासनाचे लक्ष वेधले. रहिवाशांनी या मद्य विक्री प्रतिष्ठानासमोरच "सुंदर कांडाचे" आयोजन करून अभिनव आंदोलन केले. यामध्ये महिलांचा सर्वाधिक सहभाग होता. महिलांनी काही नागरिकांना दुधाचे वाटप करून दारू ऐवजी दुध प्या,चा संदेश दिला. प्रशासनाने दारू दुकान हटविण्यासंदर्भात पाऊल उचलले नाही, तर नागरिक तीव्र निषेध नोंदवतील. आयोजनासाठी माजी आमदार संजय बंड, नगरसेविका जयश्री डाहाके, राधा कुरील, रमा छांगाणी, मीनल हिवसे, वैशाली कडू, माधुरी महल्ले, स्वाती देशमुख, लता सोहोनी,आरती बापट, अंकीत देशमुख, राजू कुरील यांच्यासह शेकडो रहिवाशांनी सहभाग नोंदविला.