सुनील देशमुख यांना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 01:10 AM2019-05-17T01:10:42+5:302019-05-17T01:11:03+5:30
राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सरकारी कामात अडथळा केल्याच्या प्रकरणात आमदार सुनील देशमुख यांचा गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सरकारी कामात अडथळा केल्याच्या प्रकरणात आमदार सुनील देशमुख यांचा गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.
विधी सूत्रानुसार, १३ आॅक्टोबर २०१४ रोजी रात्री ८ वाजता बापटवाडीतील अहिल्या मंगल कार्यालयात निवडणूक प्रचार सुरू असल्याची माहिती राजापेठ पोलीस ठाण्याला प्राप्त झाली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर साळवी यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळ गाठले. त्यावेळी भाजपचे उमेदवार सुनील देशमुख यांनी पोलिसांना अपशब्द बोलून शासकीय कामात अडथळा केला. त्याच दिवशी रात्री १० वाजता किशोर साळवी यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार आ. देशमुख यांच्याविरुद्ध भादंविचे कलम १८६ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी १५५ (२) सीआरपीसी अन्वये प्रकरणाच्या तपासाची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. ती परवानगी मिळाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.एस. भगत यांनी तपास केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी जमानती वॉरंटची तामील झाली.
आ. सुनील देशमुख गुरुवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी (न्यायालय क्र. १३) एस.डी. बिरहारी यांच्या न्यायालयात हजर झाले. या प्रकरणात आ. देशमुख यांचा जामीन मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी, न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यातर्फे वकील अनिल विश्वकर्मा यांनी युक्तिवाद केला. त्यांना अनिरुद्ध लढ्ढा व देवेंद्र दापोरकर यांनी सहकार्य केले.