सुनील गजभियेचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:21 PM2018-08-29T22:21:14+5:302018-08-29T22:21:34+5:30
बहुचर्चित शीतल पाटील हत्याकांडातील मुख्य आरोपी अॅड. सुनील गजभिये याचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) एच.व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर बुधवारी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बहुचर्चित शीतल पाटील हत्याकांडातील मुख्य आरोपी अॅड. सुनील गजभिये याचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) एच.व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर बुधवारी हा निर्णय दिला.
आक्रमण संघटनेची पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ता शीतल पाटील यांचा मृतदेह १६ मार्च २०१८ रोजी गाडगेनगर हद्दीतील एक्स्प्रेस हायवेवरील एका विहिरीत आढळला. विहिरीत सुसाइड नोट मिळाल्यानंतर शीतल पाटीलने आत्महत्या केल्याचा कयास लावला गेला. तथापि, शीतल पाटीलचा भाऊ वैभवने हत्येचा संशय व्यक्त करून गाडगेनगर पोलिसांत संघटनेचा संस्थापक सुनील गजभिये व रहेमान खानविरुद्ध तक्रार नोंदविली. शवविच्छेदनात शीतल पाटील यांची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकण्यात आल्याचे स्पष्ट झाले. आरोपीला सहकार्य करणारा शिवदास गोंडाणे (रा. गडचिरोली), नीलेश मेश्राम आणि सुनील गजभियेची पत्नी राजेश्री यांनाही पोलिसांनी अटक केली. अनैतिक संबंधातून सुटका करण्यासाठी हत्येचा कट रचल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. गाडगेनगर पोलिसांनी चौकशी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनील गजभियेकडून न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याचा जामीन न्यायालयाने नाकारला आहे. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील संदीप ताम्हणे यांनी युक्तिवाद केला.
असे आहे प्रकरण
१३ मार्च २०१८ रोजी सायंकाळी शीतल पाटील बेपत्ता झाल्या. त्याच दिवशी इर्विन चौकात सुनील गजभियेसोबत शीतल पाटीलला पाहिले गेले होते. रात्री ८.३० वाजता मोबाइल लोकेशन चांदूर बाजारजवळील शिरजगाव बंड येथील होते. रात्री १०.३० वाजता शीतलचे आईसोबत शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर फोन बंद झाला. तीन दिवसांनतर त्यांचा मृतदेह एक्सप्रेस हायवेवरील विहिरीत आढळून आला. पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, रहमान खान सोबत असताना चांदूरबाजार रोडवर कारमध्ये सुनील व शीतलचा वाद झाला. त्यानंतर सुनीलने शीतलच्या डोक्यावर लोखंडी वस्तू मारून हत्या केली आणि मृतदेह विहिरीत फेकला.