सूर्योदय परिवाराचा आधारवड हरवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 11:55 PM2018-06-12T23:55:28+5:302018-06-12T23:55:40+5:30
समाजातील सर्वच घटकांच्या उत्थानासाठी अविरत झिजलेले सद्गुरू श्री भय्युजी महाराज यांच्या अकाली निधनाचे वृत्त धडकताच येथील सूर्योदय परिवारात आधारवड कोसळल्याची भावना व्यक्त झाली.
अमरावती : समाजातील सर्वच घटकांच्या उत्थानासाठी अविरत झिजलेले सद्गुरू श्री भय्युजी महाराज यांच्या अकाली निधनाचे वृत्त धडकताच येथील सूर्योदय परिवारात आधारवड कोसळल्याची भावना व्यक्त झाली. अनेकांनी महाराजांचे अखेरचे दर्शन घ्यायला इंदुरकडे धाव घेतली. वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी येथील सूर्योदय परिवार सद्गुरुंच्या मार्गदर्शनात नेहमीच कार्यमग्न राहत आला आहे.
भय्यूजी महाराजांच्या अकाली मृत्यूने समाजाची भरून न निघणारी हानी झाली. महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात त्यांचे मोठे कार्य आहेत. अमरावतीशी महाराजांचा घनिष्ठ स्रेह राहिला. एक वर्षापूर्वी महाराजांची मुंबईला भेट घेतली होती.
- प्रवीण पोटे, पालकमंत्री
सर्व समाजाला घेऊन चालणारे सर्वसमावेशक असे महाराजांचे व्यक्तिमत्त्व होते. कधीही अडचणीत असलो की, महाराजांची भेट घ्यायचो. लगेच समस्येचे निराकरण व्हायचे. महाराज आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाही.
- प्रा.डॉ. हेमंत देशमुख, सूर्योदय परिवार
महाराजांच्या आकस्मिक मृत्यूने आमचा आधारच हिरावला. महाराजांची राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम अद्वितीय होते. आमच्यावर त्यांची वडिलांसारखी माया होती. या सर्व पे्रमाला आम्ही पारखे झालो आहोत.
- रविराज देशमुख, सूर्योदय परिवार
महाराजांच्या सान्निध्यात १० वर्षांपासून समाजकार्याशी जुळलो आहे. महाराजांच्या संकल्पाची पूर्ती करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करीत राहू. महाराजांच्या अकाली निधनामुळे आमचा आधारवड हरविला आहे.
- डॉ. स्वप्निल देशमुख, सूर्योदय परिवार
समाजातील सर्व क्षेत्रात सद्गुरु भय्यूजी महाराजांचे उदंड कार्य आहेत. वंचितांच्या शिक्षणासाठी महाराजांनी खामगाव येथे मोठी आश्रमशाळा काढली. महाराजांचे निधन झाले, यावर विश्वासच बसत नाही. आमचा मोठा आधार हिरावला गेलाय.
- जयसिंह देशमुख, सूर्योदय परिवार
महाराजांनी लाखो लोकांना जगण्याची दीक्षा दिली. महाराजांच्या निधनाबाबत विश्वासच बसत नाही. वंचित समाजाला प्रवाहात आणायचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांच्यापश्चात हे कार्य अविरत सुरू राहावे, हा आमचा प्रयत्न राहील.
- राजू सुंदरकर, सूर्योदय परिवार