अधीक्षकांना नको व्हीआयपी फाईलची ब्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:43 PM2018-05-14T23:43:22+5:302018-05-14T23:43:38+5:30
महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाचा (जीएडी) पायपोस कुणाच्याही पायात राहिलेला नाही. सहायक आयुक्तांना डावलून अनेक फायली थेट उपायुक्तांकडे जात असताना महत्त्वाच्या फायलींची ब्याद आपल्याकडेच नकोच, असा पवित्रा अधीक्षकांनी घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाचा (जीएडी) पायपोस कुणाच्याही पायात राहिलेला नाही. सहायक आयुक्तांना डावलून अनेक फायली थेट उपायुक्तांकडे जात असताना महत्त्वाच्या फायलींची ब्याद आपल्याकडेच नकोच, असा पवित्रा अधीक्षकांनी घेतला आहे. अधीक्षकांच्या या घोंगडे फेकण्याचा मानसिकतेचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची प्रतिक्रिया महापालिकेत उमटली आहे.
नियमित आस्थापनेसोबतच कंत्राटीबाबतच्या सर्व संचिका जीएडीत असणे अभिप्रेत आहे. त्याबाबतची सर्व प्रक्रिया जीएडीतूनच चालते. त्या पार्श्वभूमीवर ‘व्हीआयपी फाइलला फुटले पाय’ या वृत्तातून ‘लोकमत’ने कंत्राटी तत्त्वावरील सेवानिवृत्त अभियंत्यांच्या महत्त्वपूर्ण फाइलवर प्रकाशझोत टाकला होता. आपल्या विभागातील फाइल कुठे आहे, हेही अधीक्षकांना माहीत नव्हते. त्यानंतर कार्यकारी अभियंता १ मध्ये कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त कंत्राटी अभियंत्याने सदार यांच्या बाबतची ती फाइल आपल्याकडे असल्याची माहिती जीएडी अधीक्षकांना दिली. डाकेद्वारे ती फाइल पाठविण्याबाबत अधीक्षकांना विचारणाही केली. पण, ती फाइल तेथेच राहू द्या, उगाचच ब्याद नको, असे म्हणत अधीक्षकांनी ती महत्त्वपूर्ण फाइल परत पाठविण्याकरिता नकार दिला. अधीक्षकांकडून जीएडीतील फायलींच्या गोपनियतेची आणि गांभीर्याची कल्पना न केलेली बरी हेच हे सांगते. कार्यकारी अभियंता-१ च्या दालनातील कपाटात ती फाइल पडली असून, त्याच कार्यालयातून ती पुढे सरकवली जाते. मुदतवाढ जीएडीकडून प्रस्तावित करणे अभिप्रेत असताना अधीक्षकांनी बिनदिक्कतपणे ती महत्त्वपूर्ण फाइल आवक-जावक मध्ये न नोंदविता कंत्राटी अभियंत्याकडे दिली.
म्हणून तुमच्याकडेच ठेवा
कंत्राटी शहर अभियंता जीवन सदार यांच्या मुदतवाढीची फाइल सेवानिवृत्त कंत्राटी अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्याकडून चालली. आयुक्त सिंगापूरला चालले असल्याने कुळकर्णींनी हातोहात फाइल फिरवून सदारांची मुदतवाढीवर आयुक्तांची स्वाक्षरी घेतली. ती फाइल जीएडीने चालविली नाही. त्यामुळे त्यापासून ती फाईल कुळकर्णींकडे असल्याचा पुनरूच्चार जीएडी अधीक्षकांना केला आहे. तसेही सदारांचा कार्यकाळ जूनमध्ये संपुष्टात येतो आहे. त्यामुळे त्या फाइलची आता गरजच भासणार नाही. त्यामुळे ती फाइल तुमच्याकडेच ठेवा, असा सूचना अधीक्षकांनी आपल्याला दिल्याचे कुळकर्णी म्हणाले.