अधीक्षक खुर्चीवर; सहायक आयुक्त दालनाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 11:05 PM2018-05-06T23:05:17+5:302018-05-06T23:06:48+5:30
सामान्य प्रशासन विभागाच्या प्रभारी अधीक्षकांंना खुर्ची सोडवत नसल्याने सहायक आयुक्तांकडून हक्काची खुर्ची हिरावली गेली आहे. सहायक आयुक्तांना अधीक्षकांच्या दालनातील टेबलविना असलेल्या खुर्चीवर बसून कामकाज सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सामान्य प्रशासन विभागाच्या प्रभारी अधीक्षकांंना खुर्ची सोडवत नसल्याने सहायक आयुक्तांकडून हक्काची खुर्ची हिरावली गेली आहे. सहायक आयुक्तांना अधीक्षकांच्या दालनातील टेबलविना असलेल्या खुर्चीवर बसून कामकाज सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे. ते मवाळ स्वभावी असल्याने त्यांचेवर ‘कुणी कॅबीन देता का कॅबीन’ अशी आर्जव करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
प्रभारी उपायुक्त महेश देशमुख यांनी यावर तोडगा काढावा व आदेश पारीत करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जीएडीच्या स्वतंत्र कॅबिनमध्ये अधीक्षक स्थानापन्न होत असल्याने ओगलेंचा नाईलाज झाला आहे.
महापालिका आस्थापनेवरील मोजक्या अनुभवी अधिकाऱ्यांपैकी एक असलेले सहायक आयुक्त राहूल ओगले हे एप्रिलच्या तिसºया आठवडयात सेवेत परतले. शासनआदेशाच्या अधिन राहून त्यांना कामावर घेण्यास हरकत नसल्याचे मत विधीज्ञांनी दिल्यानंतर एप्रिलच्या आमसभेने त्यांना कामावर पुन्हा रुजू करुन घेण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली. त्यानंतर त्यांचेकडे सामान्य प्रशासन विभागाचे (जीएडी) सहायक आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली. मागील वर्षभराच्या काळात जीएडी चालवितो तरी कोण, असा प्रश्न पडेपर्यत जीएडीची दुरावस्था झाली आहे. जीएडी अधीक्षक मिसाळ चालवितात की कंत्राटी आॅपरेटर सुरज निमकर? असा प्रश्न महापालिकेत विचारला जाऊ लागला. त्या पार्श्वभूमिवर राहूल ओगले या दीर्घानुभवी अधिकाºयाकडे जीएडीची जबाबदारी दिल्याने आयुक्तांचे प्रशासनिक कौतूक करण्यात आले. ओगले जीएडीत रूजू झाले. मात्र, दालनात अधीक्षक बसत असल्याने व त्यांनी जेष्ठ अधिकाऱ्याला खुर्ची न दिल्याने कामकाज हाताळण्यासाठी नेमके बसायचे कुठे, असा पेच ओगलेंसमक्ष उभा ठाकला. ओगलेंपुर्वी जीएडीचे सहायक आयुक्त पदाची जबाबदारी निवेदिता घार्गे या तरुणतुर्क अधिकाऱ्याने सांभाळली. त्या जीएडीतील दालनात बसून कामकाज हाताळायच्या. तेव्हा अधीक्षक मिसाळ दालनाबाहेर असलेल्या अन्य ठिकाणाहून कामकाज सांभाळायचे. त्यांचा बहुतांश वेळ नगरसचिव कार्यालयात जायचा. तथापि घार्गे रजेवर गेल्यानंतर जीएडीच्या सहायक आयुक्त पदाची संगीत खुर्ची झाली.
अधीक्षकांना सहायक आयुक्त ज्येष्ठ
अधीक्षक मिसाळ जीएडीची सर्वेसर्वा झालेत. मात्र ओगलेंच्या प्रवेशाने मिसाळांच्या एककल्लीपणाला ब्रेक लागला. त्या स्पर्धेतून तर ओगलेंना दालनात बसू दिले जात नसावे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अधीक्षक मिसाळ दालनातील मुख्य खुर्चीवरुन उठत नसल्याने जीएडीत जावे तरी कशाला आणि बसायचे तरी कुठे असा प्रश्न ओगलेंना सतावत असल्याने ते इतरत्र बसून कामकाज सांभाळण्याचे दिव्य करत आहेत. मिसाळ ज्यावेळी दालनात नसतात, त्यावेळी सुध्दा ओगले दालनातील मुख्य खुर्चीवर बसत नाहीत. ओगले यांच्यावर येऊन ठेपलेल्या या परिस्थितीला काही कर्मचारी मिसाळ यांना कारणीभूत मानतात. त्याचवेळी आधीप्रमाणे मिसाळ यांनी दालनातील खुर्ची सहायक आयुक्तांना द्यावी, अशी अपेक्षा जीएडीतील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मिसाळ आणि ओगले हे समवयीन असले तरी ओगले त्यांना प्रशासकीय दृष्टीने ज्येष्ट आहेत. त्यामुळे सहायक आयुक्त या पदाचा मान ठेऊन तरी त्यांना त्यांची हक्काची खुर्ची बहाल करावी किंवा अधीक्षकांना जीएडीतील दालनातच बसायचे असेल तर सहायक आयुक्तांसाठी बसण्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा कर्मचारी व्यक्त करु लागले आहेत.
ओगलेंसमोर आव्हान
अधीक्षक दुर्गादास मिसाळांची प्रशासकीय भूमिका व्यक्तीसापेक्ष व प्रकरणपरत्वे ठरत असल्याने जीएडीचा पायपोस कुणाच्या पायात राहिलेला नाही. डझनभर लिपिक असताना अत्यंत महत्वाच्या दस्तावेज कंत्राटी आॅपरेटरकडून हाताळले जातात. ही बाब प्रभारी उपायुक्त महेश देशमुख यांनाही ज्ञात आहे. महापालिकेतील सर्वाधिक महत्वपूर्ण विभाग प्रशासकीय लालफितशाहीसह कंत्राटी आॅपरेटरच्या कहयात गेल्याने जीएडीची रया गेली आहे. त्यामुळे ओगलेंसमक्ष जीएडी ताळ्यावर आणण्याचे आव्हान आहे.
मिसाळांची बैठक नगरसचिव विभागात
अधीक्षक मिसाळ हे कार्यालयीन वेळेत जीएडीव्यतिरिक्त नगरसचिव विभागात बहुतांश काळ असतात. निवडणूक विषयक कामकाजाचा प्रभार आपल्याकडे असल्याने आपण येथे बसतो, असा मिसाळांचा दावा आहे. मात्र, निवडणूक होऊन एक वर्ष लोटले असताना मिसाळांना निवडणूक विषयी काम तरी नेमके काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जीएडीत ते नसले की ते तांबेकरांकडे बसले असतील, असे ठामपणे सांगितले जाते. कामकाजात गोपनियता राखण्यासाठी कुठलीच माहिती ‘आरटीई’ शिवाय न देणाºया मिसाळांचा बहुतांश कार्यालयीन वेळ कुठे जातो, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुणालाही पाहणे शक्य आहे.