३ जुलै रोजी दिसणार सुपरमून...; पृथ्वी अन् चंद्रातील अंतर राहणार ३.७० लाख किमी
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: June 30, 2023 06:20 PM2023-06-30T18:20:20+5:302023-06-30T18:26:23+5:30
Supermoon 2023 : सुपरमून ही एक खगोलीय घटना आहे, ज्यामध्ये चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ येतो.
अमरावती : येत्या ३ जुलै रोजी पृथ्वी व सूर्याचे अंतर कमी राहणार असल्याने या दिवशी ‘सुपरमून’ दिसणार आहे. चंद्र या दिवशी मोठा व प्रकाशमान दिसेल. पृथ्वी व चंद्र दरम्यानचे सरासरी अंतर ३.८५ लाख किमी असते. या दिवशी मात्र, ३.७० लाख किमी राहत असल्याने सुपरमूनचा अनुभव घेता येणार आहे.
चंद्राचे वय हे ४.६५ लाख अब्ज वर्ष आहे. चंद्र हा पृथ्वीपासून दरवर्षाला ३.८ लाख सेंमी. लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग होईल व १०० वर्षांनी हा दिवस २ मिली सेकंदाने मोठा होईल. चंद्रावर ३० हजार विवरे व १२ हजार पर्वत आहेत. पर्वत व विवरे दुर्बिनीमधून चांगल्या प्रकारे पाहता येतात. ३ जुलै रोजी दिसणारा सुपरमून सर्वांनी अवश्य पाहावा व अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.
प्रकाशकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास १.३ सेकंद लागतात
चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती, ओहोटीची तीव्रता वाढणे, वादळ यासारख्या घटना घडू शकतात. पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा फक्त ५९ टक्के भाग पाहता येतो. चंद्रावरून पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते. याशिवाय चंद्रावरून प्रकाशकिरण पृथ्वीवर येण्यास १.३ सेकंद लागत असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले.