१४ जून रोजी दिसणार ‘सुपरमून’; भरती-ओहोटी व वादळाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 09:18 PM2022-06-02T21:18:30+5:302022-06-02T21:19:47+5:30
Amravati News यावर्षी एकूण ३ ‘सुपरमून’ दिसणार आहे. त्यापैकी पहिला ‘सुपरमून’ १४ जून रोजी रात्री पौर्णिमेच्या दिवशी दिसणार आहे.
अमरावती : यावर्षी एकूण ३ ‘सुपरमून’ दिसणार आहे. त्यापैकी पहिला ‘सुपरमून’ १४ जून रोजी रात्री पौर्णिमेच्या दिवशी दिसणार आहे. पृथ्वी-चंद्र हे अंतर नेहमी सरासरी ३ लाख ८५ हजार किलोमीटर असते, परंतु मंगळवार, १४ जून रोजी हे अंतर सरासरी ३ लाख ५७ हजार ४३६ किलोमीटर कमी राहील. त्यामुळे चंद्रबिंब मोठे व प्रकाशमान दिसेल, चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तीव्रता वाढणे, वादळ यासारख्या घटना घडू शकतात.
या सुपरमूनला ‘रोझ मून’ हे नाव दिले आहे. यादिवशी चंद्र मोठा दिसेल. चंद्र जास्त तेजस्वी असणार आहे. पृथ्वी आणि चंद्रामध्ये सर्वाधिक कमी अंतर हे २५ नोव्हेंबर २०३५ रोजी असेल. ६ डिसेंबर २०५२ रोजी शतकातील सर्वात मोठा सुपरमून पाहायला मिळेल.
पृथ्वीवरून आपल्याला नेहमी चंद्राचा ५९.५ भाग पाहता येतो. चंद्रावरून पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते. चंद्रावरून पृथ्वीवर प्रकाशकिरण येण्यास १.३ सेकंद लागतात. जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३,७०,००० कि. मी.च्या आत असते, त्याला ‘सुपरमून’ असे म्हणतात. चंद्राचे वय हे ४.६५ अब्ज वर्ष आहे. चंद्र हा पृथ्वीपासून दरवर्षाला ३.८ सेंटीमीटर लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होईल व १०० वर्षांनी दिवस हा २ मिली सेकंदने मोठा होईल. चंद्रावर ३० हजार विवरे व १२ पर्वत आहे. पर्वत व विवरे दुर्बिणीमधून अगदी चांगल्याप्रकारे पाहता येतात.
१४ जून रोजी रात्री दिसणारा सुपरमून खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी अवश्य बघावा. हा सुपरमून अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येईल, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली आहे.