पेट्रोलपंपांवर आठ दिवसांत सुविधा पुरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 10:09 PM2017-08-21T22:09:28+5:302017-08-21T22:09:50+5:30
जिल्ह्यासह शहरातील पेट्रोलपंपावर ग्राहकांशी निगडित सोईसुविधा आठ दिवसांत पुरवा, अन्यथा नियमानुसार कारवाईला सामोरे जावे लागेल,
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यासह शहरातील पेट्रोलपंपावर ग्राहकांशी निगडित सोईसुविधा आठ दिवसांत पुरवा, अन्यथा नियमानुसार कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी आक्रमक भूमिका जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी आॅईल कंपन्यांच्या प्रबंधकांच्या बैठकीत घेतली. प्रसाधनगृह, वाहनात नि:शुल्क हवा आणि पिण्याचे पाणी ही अत्यावश्यक बाब म्हणून नोंद घेण्यात आली.
जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांच्या दालनात सोमवारी आॅईल कंपन्यांच्या पेट्रोलपंप प्रबंधकांची बैठक पार पडली. यावेळी एचपीसीएलचे रोहित यादव, आयओसीएलचे रविकांत देवांगण व बीपीसीएलचे हिमांशू केसरवानी आदी उपस्थित होते. यावेळी डीएसओ टाकसाळे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील पेट्रोलपंपांवर दोन दिवसांपूर्वी पुरवठा निरीक्षकांनी तपासणी करून सादर केलेल्या अहवालावर बोट ठेवले. आॅईल कंपन्या व्यवसाय करीत असतील तर ग्राहकांना सोईसुविधा पुरविण्याची जबाबदारी पंप मालकांची आहे. ही बाब डीएसओ टाकसाळे यांनी स्पष्ट केली. दरम्यान डीएसओंनी असुविधा असलेल्या पेट्रोलपंपांची यादी आॅईल कंपन्यांच्या प्रंबधकांच्या पुढ्यात ठेवली. यावेळी गतवर्षीच्या अहवालावरही चर्चा करण्यात आली. ग्राहकांशी संबंधित सुविधा आठ दिवसांत पुरविल्या नाहीत, तर आता पंपमालकांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे निर्देश डीएसओ टाकसाळे यांनी दिले.
ग्रामीण भागातील ११८ पेट्रोलपंप तपासणी अहवाल अप्राप्त आहे. मात्र वाहनात हवा, पिण्याचे पाणी आणि प्रसाधन गृहांचा अभाव ही समस्या सारखीच आहे. त्यामुळे ही समस्या प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
- अनिल टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी