जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
By admin | Published: May 3, 2016 12:23 AM2016-05-03T00:23:24+5:302016-05-03T00:23:24+5:30
संपूर्ण अमरावती जिल्ह्यात गाजलेल्या अमित बटाऊवाले हत्याकांडातील पाच आरोपींना उच्च न्यायालयातून जामीन मिळालेला आहे.
अमित हत्याकांड : ६ मे तारीख, २ आरोपीविरुध्द गृहमंत्रालयात परवानगी
अचलपूर : संपूर्ण अमरावती जिल्ह्यात गाजलेल्या अमित बटाऊवाले हत्याकांडातील पाच आरोपींना उच्च न्यायालयातून जामीन मिळालेला आहे. पैकी तीन आरोपींचा मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून अजून एका आरोपीसाठी जामीन विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितली आहे. आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची अचलपूरच्या गुन्हेगारी जगताच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.
अचलपूर येथे ११ आॅगस्ट रोजी रेती तस्करी करणाऱ्या बारुद गँगने भर दिवसा रहदारीच्या रस्त्यावर अमित बटाऊवाले या युुवकाची हत्या करून त्याचे वडील मोहन यांना गंभीर जखमी केले होते. या हत्येने अचलपूर-परतवाडा शहरासह संपूर्ण तालुका हादरला होता. यातील १५ आरोपींना मोठ्या शिताफीने अणि आपले कसब पणाला लावून ठाणेदार नरेंद्र ठाकरे व तपास अधिकारी असलेले ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार अजय आखरे यांनी टप्प्याटप्प्याने अटक केली होती. मागील सहा-सात महिन्यांपासून ते अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात कैद आहेत. पैकी मो.शारीक अब्दूल रहमान, मो.मतीन याला फेब्रुवारीत, तर मो.आदील मो. अन्वर याला २ मार्च २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून जामीन मंजूर केला होता.
पोलिसांनी याविरुध्द सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे एक याचिका दाखल करून मो.शारीक, मो.अश्फाक व मो.मतीन यांचा जामीन रद्द करण्याची विनंती केली आहे. या तिघांना त्यांची बाजू मांडण्यासाठी ६ मे ही तारीख सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. तसेच अर्जदार खान व मो. आदील यांनाही गेल्या मार्च महिन्यात उच्च न्यायालयातून जामीन देण्यात आला होता. याचा जामीन रद्द करण्यासाठी गृहमंत्रालयाकडे, सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी परवानगी मागितली असल्याची माहिती आहे. दरम्यान, अचलपूर येथील जिल्हा न्यायालयाने नगरसेवक मो.शाकीर, बब्बू पठाण, मो.आबीद व अन्वरखान यांचा जामीन अर्ज २५ मार्च रोजी फेटाळला असून त्यांनी उच्च न्यायालयात जाण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. अमित बटाऊवाले हत्याकांड संपूर्ण जिल्ह्यात गाजले असून सरकारतर्फे मुंबई येथील उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.