सुरेंद्रचेही बोट शिरीष चौधरींकडेच!
By Admin | Published: September 18, 2016 12:10 AM2016-09-18T00:10:12+5:302016-09-18T00:10:12+5:30
प्रथमेश आणि अजय यांच्यावर नरबळीच्या हेतुने हल्ला करणारा मुख्य आरोपी सुरेंद्र मराठे याने गंभीर आरोप करून आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांच्याकडे बोट दाखविले आहे.
तरीही अभय : कार्याध्यक्षांविरुद्ध फिर्यादी अन् आरोपी दोघांच्याही पोलीस तक्रारी
अमरावती : प्रथमेश आणि अजय यांच्यावर नरबळीच्या हेतुने हल्ला करणारा मुख्य आरोपी सुरेंद्र मराठे याने गंभीर आरोप करून आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांच्याकडे बोट दाखविले आहे. प्रथमेशच्या नातेवाईकांनंतर आता आरोपीनेही चौधरींविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलीस आतातरी चौधरींच्या मुसक्या आवळतील काय, हे कळेलच.
सुरेंद्रने तपास अधिकाऱ्यांना आश्रमातील प्रभावशाली मंडळींनी त्याला कसे या गुन्ह्यात अडकविले, त्याला कसा गुन्हा कबूल करायला लावला, यासंबंधीचे बयाण दिले होते; तथापि त्याने दिलेले बयाण पोलिसांनी अधिकृतपणे तपासात घेतलेच नाही, असा आरोप सुरेंद्रच्या वडिलांनी केला आहे.
सुरेंद्रने त्याच्या वडिलांना दिलेली माहिती धक्कादायक आहे. आर्वी तालुक्यात वास्तव्याला असलेल्या रमेश मराठे यांनी शनिवारी अमरावती गाठले. जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्यांनी लेखी तक्रार दिली. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनाही त्यांनी निवेदन दिले. त्यांच्या मते, सुरेंद्रने दिलेली गुन्ह्याची कबुली बळजोरीची आहे. ही कबुली देण्यासाठी त्याला आश्रमातील ज्या प्रभावशाली व्यक्तींनी भाग पाडले, त्यात एकूण चार जणांचा समावेश आहे.
सुरेंद्रने गुन्हा कबूल करावा, यासाठी त्याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करण्यासाठी या मंडळींनी पोलिसांचाही वापर केला. तीन ते चार दिवस आश्रमातील ही मंडळी पोलीस अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात होती. जिवाच्या भीतीमुळे सुरेंद्रने गुन्हा कबूल केला. सुरेंद्रला फसविणाऱ्या बड्या चार लोकांमध्ये आश्रमाचे अधिकृत कर्तेधर्ते शिरीष चौधरी यांचा समावेश आहे.
शिरीष चौधरी यांच्याभोवती सर्वत्र संशयाचे गडद ढग आहेत. त्यांच्याविरुद्ध समान्यजनांतूनही अनेक तक्रारी झाल्या. लोकांदोलनांमध्ये चौधरींविरुद्ध प्रक्षुब्ध मते व्यक्त झाली. आता तर नरबळीप्रकरणी त्यांच्याविरुद्ध फिर्यादी आणि आरोपी अशा दोन्ही बाजुंनी गंभीर तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. ज्यांच्याकडे अधिकार आहेत, त्या व्यक्तीविरुद्ध अशा टोकाच्या दिशांनी पोलीस तक्रारी दाखल होत असतानाही श्रीनिवास घाडगे यांना चौधरींना अटक करावीशी वाटू नये, हे न उमगणारेच कोडे आहे. या अत्यंत संवेदनशील आणि तितक्याच गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आकलनाची जी विशिष्ट ऊंची तपास अधिकाऱ्याकडे असणे अपेक्षित आहे, ती घाडगे यांच्या ठायी असल्याचे गृहित धरूनच त्यांना हा तपास सोपविण्यात आला असावा. तथापि शिरीष चौधरी, जे कार्याध्यक्ष आहेत, ते प्रथमेशच्या नातेवाईकांना चक्क धमकवतात. इस्पितळातून जाण्यास सांगतात. त्यांच्या पत्नीला ते प्रथमेशच्या खोलीच चोरून पाठवितात. त्यानंतर प्रथमेशच्या नातेवाईकांनाच गुंडांप्रमाणे धमकवितात. याची तक्रार नोंदविली जाते. चौधरींना तरीही अटक होत नाही. काय अर्थ याचा? चौधरींच्याच आश्रमातील आरोपी चौधरींनी फसविल्याची तक्रार करतो, तरी चौधरी मोकळेच? घाडगे साहेब, जनतेला उत्तर हवे आहे, सांगा चौधरींना इतकी कवचकुंडले देण्याचे कारण काय?