आर्श्चयाचा धक्का बसला, सुवर्णपदकांची अपेक्षा नव्हती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:11 AM2021-05-30T04:11:44+5:302021-05-30T04:11:44+5:30
तेजस राठी; पाच सुवर्ण, एक रौप्य, एक रोख पारितोषिकाचा ठरला मानकरी अमरावती : ध्येय गाठायचे उद्दिष्ट होते. त्यानुसार नियमित ...
तेजस राठी; पाच सुवर्ण, एक रौप्य, एक रोख पारितोषिकाचा ठरला मानकरी
अमरावती : ध्येय गाठायचे उद्दिष्ट होते. त्यानुसार नियमित अभ्यास आणि शिकवणीचे नियोजन केले. दररोज पहाटे चार ते पाच तास अभ्यास करायचो. मात्र, पाच सुवर्ण, एक रौप्य, एक रोख पारितोषिक मिळेल, असे अपेक्षित नव्हते. हा क्षण मला आश्चर्याचा धक्का देऊन गेला, अशी प्रांजळ कबुली अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी तेजस राठी याने दिली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३७ व्या आभासी दीक्षांत समारंभात मुलांमधून सर्वाधिक सुवर्णपदके तेजस राठी याने पटकाविले असून, तो ‘लाेकमत’शी बोलत होता. तेजस याने कोरोनाकाळात आंतरवासिता कालावधी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तीन महिने, तर उर्वरित कालावधी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पूर्ण केला. आता तो नजीकच्या आष्टी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाच्या निर्देशानुसार वैद्यकीय सेवेचा बाँड पूर्ण करीत आहे. कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, हे निश्चित झाल्यानंतर त्याकडे झोकून द्या, नक्कीच यश मिळते, हे मला मिळालेल्या पदकाने सिद्ध झाले आहे. अगोदरपासून रुग्णसेवा करायची इच्छा होती. कुटुंबाची समर्थ साथ मिळाली. अकोला येथे २०१५ ते २०२० या कालावधीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. पुढे नीट, पीजी करून एमडी मेडिसीन करायचे असल्याचे तेजस याने सांगितले. दिल्ली येथील वैद्यकीय कोचिंगमुळे पाच सुवर्ण, एक रौप्य, एक रोख पारितोषिक मिळविता आले. मन लावून, नियोजनपूर्वक अभ्यास करा, यश नक्कीच मिळेल, असा संदेश त्याने विद्यार्थ्यांना दिला.