तब्बल ११ महिन्यांनंतर सिद्धार्थ मनोहरेचे आत्मसमर्पण, डीएससीचा गैरवापर करून ९८ लाखांच्या अपहाराचे प्रकरण
By प्रदीप भाकरे | Published: February 2, 2023 08:22 PM2023-02-02T20:22:13+5:302023-02-02T20:23:52+5:30
कोतवाली पोलिसांनी २ मार्च २०२२ रोजी धारणी तालुक्यातील टिटंबा, घुटी, काकरमल या तीन ग्रामपंचायतींच्या फसवणुकीबाबत तीन तर बिजुधावडी, चौराकुंड व मांगिया या तीन ग्रामपंचायतींबाबत एक असे एकूण चार एफआयआर नोंदविले होते.
अमरावती : धारणी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सचिवांच्या डीएससीचा गैरवापर करून ९८ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल असलेल्या सिद्धार्थ मनोहरे याने न्यायालयाच्या आदेशान्वये आत्मसमर्पण केले. आर्थिक गुन्हे शाखेने ४ फेब्रुवारीपर्यंत त्याची पोलिस कोठडी मिळविली आहे.
कोतवाली पोलिसांनी २ मार्च २०२२ रोजी धारणी तालुक्यातील टिटंबा, घुटी, काकरमल या तीन ग्रामपंचायतींच्या फसवणुकीबाबत तीन तर बिजुधावडी, चौराकुंड व मांगिया या तीन ग्रामपंचायतींबाबत एक असे एकूण चार एफआयआर नोंदविले होते. त्यानुसार कंपनी संचालक अनिल पुंडलिकराव खडसे (रा. श्यामनगर, अमरावती) व सिद्धार्थ रमेश मनोहरे (रा. अंजनसिंगी, ता. धामणगाव रेल्वे) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. सहा ग्रामपंचायतींच्या खात्यातून दोन्ही आरोपींच्या खात्यात एकूण ६२ लाख ९ हजार ७३५ रुपये परस्परच वळती करण्यात आली होती. त्यानंतर त्या रकमेत वाढ झाली. आरोपींनी आपल्याला त्याच्या श्यामनगर स्थित कार्यालयात बोलावून घेऊन आमच्या डिजिटल साइन असलेला पेनड्राइव्ह ठेवून घेतला. त्यानंतर त्या डीएससीचा गैरवापर करून ग्रामपंचायतीच्या खात्यातून स्वत:च्या खात्यात रक्कम वळती केली, असे ग्रामसचिवांनी तक्रारीत म्हटले होते. न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने खडसे याने गतवर्षीच एप्रिलमध्ये आत्मसमर्पण केले होते, तर मनोहरे हा गुन्हा दाखल होण्यापूर्वीपासूनच फरार झाला होता.
दोषारोप पत्रही दाखल -
मनोहरे हा फरार असताना त्याने मार्च २०२२ मध्येच स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो नाकारल्याने त्याने नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली होती. दरम्यान, मनोहरे फरार दर्शवून आर्थिक गुन्हे शाखेने रेकॉर्डब्रेक वेळेत दोषारोप पत्र दाखल केले. मी नव्हे तर मनोहरे हाच त्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड असल्याचा दावा खडसे याने केला होता. त्यामुळे मनोहरेच्या शोधासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले होते.
तिसऱ्या गुन्ह्यात पोलिस कोठडी -
अटकपूर्व जामीन न देता उच्च न्यायालयाने सिद्धार्थ मनोहरे याला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्याने १६ जानेवारी रोजी स्थानिक न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. १९ जानेवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखेने त्याला अटक करून त्याची पोलिस कोठडी मिळविली. चारपैकी तिसऱ्या एफआयआरमध्ये तो ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत आहे. चौथ्या गुन्ह्यातदेेखील त्याचा पीसीआर मागितला जाणार आहे. तो सलग १२ दिवसांपासून पोलिस कोठडीत आहे.