६ हजार ३९६ सार्वजनिक पिण्याच्या जलस्रोतांचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:13 AM2021-04-21T04:13:21+5:302021-04-21T04:13:21+5:30
अमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ८३९ ग्रामपंचायत क्षेत्रांतील १ हजार ५०८ गावांमधील ६ हजार ३९६ ...
अमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ८३९ ग्रामपंचायत क्षेत्रांतील १ हजार ५०८ गावांमधील ६ हजार ३९६ सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या जलस्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून दरवर्षी एप्रिल ते जून आणि ऑक्टोबर ते डिसेंबर अशा दोन टप्प्यात जलस्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार यंदा पहिल्या टप्प्यातील मान्सूनपूर्व जलस्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण जिल्हा परिषद आरोग्य विभागाने १५ एप्रिलपासून १४ तालुक्यांतील ८३९ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात सुरू केले आहे. ही प्रक्रिया आरोग्य कर्मचारी व जलसुरक्षा रक्षक यांच्यामार्फत राबविली जात आहे. या सर्वेक्षणात १० प्रकारची माहिती घेतली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने स्रोताभोवतालचा परिसर अस्वच्छ आहे का, १५ मीटर अंतरापर्यत सांडपाणी साचून राहते का, स्रोताच्या सर्वांत जवळील शौचालय, गोठा १५ मीटर अंतरावर उंचावर आहे का, अशा प्रकारचे प्रश्नाची माहिती घेऊन १०० गुण दिले जाणार आहेत. संबंधित स्रोतांच्या स्थितीनुसार त्याला गुणांकन केले जाणार आहे. यानंतर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत आरोग्य विभागाकडे अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाते.
बॉक्स
असे दिले जातात कार्ड, अधिकार कुणाला?
लाल कार्ड - तीव्र जोखीम - सीईओंच्या स्वाक्षरीने
ग्रीन कार्ड - मध्यम जोखीम -संबंधित मेडिकल ऑफिसर
पिवळे कार्ड - सौम्य जोखीम- बीडीओ व तालुका वैद्यकीय अधिकारी
कोट
आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारी,जलसुरक्षा रक्षक यांच्यामार्फत सर्वेक्षण सुरू झाले आहे. जून महिन्यापर्यंत सर्वेक्षण पूर्ण होईल. याबाबतचा अहवाल आल्यानंतर स्रोताबाबचे कार्ड ग्रामपंचायतींना सीईओ, डीएचओ यांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाणार आहे.
- मनीषा सूर्यवंशी, जिल्हा साथरोग अधिकारी