म्युकरमायकोसिस संसर्गाबाबत जिल्ह्यात सोमवारपासून सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:48+5:302021-06-05T04:10:48+5:30
म्युकरमायकोसिसबाबत सर्वदूर भरीव जनजागृती करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्याचप्रमाणे, तालुका स्तरावर स्थापित हेल्पलाईन यंत्रणेद्वारे बरे ...
म्युकरमायकोसिसबाबत सर्वदूर भरीव जनजागृती करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्याचप्रमाणे, तालुका स्तरावर स्थापित हेल्पलाईन यंत्रणेद्वारे बरे झालेल्या बाधितांशी नियमित संपर्क ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी निर्देश दिले होते. त्याच अनुषंगाने गावोगाव सर्वेक्षण व जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेत उपचारानंतर बरे झालेल्या कोरोनाबाधितांच्या घरी भेटी देऊन कोविडपश्चात घ्यावयाची काळजी, लक्षणांबाबत माहिती देणे व कुणाला लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार मिळवून देणे ही कामे करण्यात येणार आहेत. आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून गावनिहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या कामासाठी आशा स्वयंसेविकांना दीडशे रुपये प्रतिदिवस प्रोत्साहन भत्ताही देण्यात येणार आहे. तसे आदेश सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. रणमले यांनी दिली.
म्युकरमायकोसिसबाबत वेळीच निदान व वेळेत उपचार होणे हे सगळ्यांत महत्त्वाचे असते. त्यामुळे कुठलेही लक्षण आढळल्यास तत्काळ उपचार सुरू करावे. आशा स्वयंसेविका कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडत असून, सर्वेक्षणासाठी नागरिकांनी त्यांना परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हाधिकारी नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रेवती साबळे, डॉ. विनोद करंजेकर यांनी केले आहे.