भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी सूर्यवंशी, डेहनकर शहराध्यक्ष
By Admin | Published: January 18, 2016 12:02 AM2016-01-18T00:02:49+5:302016-01-18T00:02:49+5:30
भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश सूर्यवंशी तर शहराध्यपदी जयंत डेहनकर यांची रविवारी अविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक : ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, हार-तुऱ्यांचा वर्षाव
अमरावती : भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश सूर्यवंशी तर शहराध्यपदी जयंत डेहनकर यांची रविवारी अविरोध निवड करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, हार- तुऱ्यांचा वर्षाव अन् पेढे भरवून नवनियुक्त अध्यक्षांचे कौतुक करण्यात आले.
स्थानिक राजापेठस्थित भाजपा कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. प्रारंभी जिल्हाध्यक्ष तर नंतर शहराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अकोला येथील तेजराव थोरात, चिखली येथील विजय कोठारी यांनी कामकाज सांभाळले. जिल्हाध्यक्षपदासाठी दिनेश सूर्यवंशी तर शहराध्यक्षपदासाठी जयंत डेहनकर यांच्या नावे प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाला. ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. यापूर्वी भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी आ. प्रकाश भारसाकळे तर शहराध्यपदी नगरसेवक तुषार भारतीय होते. मात्र संघटनात्मकदृष्ट्या भाजपाने जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे ठरविले होते. त्यानुसार रविवारी ही निवडणूक पार पडली. भाजपच्या जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षपदी नवा चेहरा कोण? ही उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली होती. सूर्यवंशी, व डेहनकर यांच्या निवडीने याबाबतच्या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. निवडणुकीदरम्यान भाजपाचे प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर, आ. सुनील देशमुख, आ. अनिल बोंडे, आ. रमेश बुंदिले, भाजपचे नेते अरुण अडसड, मधुकर उमेकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, किरण पातुरकर, मावळते शहराध्यक्ष तुषार भारतीय, तेजराव थोरात, माजी महापौर किरण महल्ले, रुपेश ढेपे, गजानन कोल्हे, महिला शहराध्यक्ष राधा कुरील, रविंद्र खांडेकर, मुन्ना सेवक, गंगा खारकर, विनय नगरकर आदी भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहनकर यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)