महिलांची बाथरूममधील छायाचित्रे काढल्याचा संशय; ‘रूमबॉय’ला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 11:18 PM2019-07-29T23:18:42+5:302019-07-29T23:19:09+5:30
महिला व पुरुषांच्या सामुदायिक बाथरूमचा फायदा घेत महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे घेतल्याच्या संशयावरून राजापेठ पोलिसांनी हॉटेलच्या एका रूमबॉयला रविवारी रात्री अटक केली. या घटनेमुळे हॉटेलमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. पंकज नारायण खडसे (१९, रा.वडाळी) असे आरोपीचे नाव आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महिला व पुरुषांच्या सामुदायिक बाथरूमचा फायदा घेत महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे घेतल्याच्या संशयावरून राजापेठ पोलिसांनी हॉटेलच्या एका रूमबॉयला रविवारी रात्री अटक केली. या घटनेमुळे हॉटेलमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. पंकज नारायण खडसे (१९, रा.वडाळी) असे आरोपीचे नाव आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स मीडियाशी जुळलेल्या उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्यातील इंद्रपूरम् येथील महिलेने रविवारी राजापेठ पोलिसांत या घटनेविषयी तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार, काही सहकारी कर्मचाऱ्यांसोबत हॉटेल इम्पेरिया येथे थांबलेली महिला हॉटेलच्या खोलीचे दार उघडे ठेऊन लॅपटॉपवर काही काम करीत असताना, एक तरुण अकारण खोलीसमोरून चकरा घालत होता. इतर खोल्यांची दारे बंद असल्यामुळे हॉटेलच्या पॅसेजमध्ये शुकशुकाट होता. महिलेने आरडाओरड केल्याने तिचे सहकारी खोल्यांमधून बाहेर निघाले. यादरम्यान त्यांनी हॉटेलच्या खालच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता, हॉलमध्ये सुरु असलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात नागरिकांनी एका तरुणास पकडून ठेवले होते. महिलेने त्या तरुणाला पाहिले. त्यांच्या खोलीसमोर चकरा घालणारा तोच तरुण असल्याचे निदर्शनास आले. दिलीप गायगोले नामक व्यक्तीने पंकज खडसेला पकडून ठेवले होते.
पंकज खडसेने हॉलमधील महिला व पुरुषांच्या सामुदायिक बाथरूममधून लपून-छपून महिलांची छायाचित्रे काढली असावी, असा संशय तक्रारकर्त्या महिलेने राजापेठ पोलिसांत दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला. त्यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी पकंज खडसेविरुद्ध भादंविच्या कलम ३५४ (क) अन्वये गुन्हा नोंदविला. त्याला अटक करण्यात आली आहे.
स्मार्ट फोन फॉरमेट करण्याचे कारण काय?
रविवारी रात्री हॉटेल इम्पेरियात ही घटना घडल्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांना दिलीप गायगोले नामक व्यक्तीने आरोपीचा मोबाइल सोमवारी आणून दिला. त्यावेळी तो स्मार्ट फोन फॉरमेट करण्यात आला होता. आरोपीचा स्मार्ट फोन फॉरमेट का करण्यात आला, त्यात महिलांची अश्लील छायाचित्रे होती की नाही, ही बाब पोलिसांसाठी महत्त्वाची होती. तो स्मार्ट फोन महत्त्वाचा पुरावा असताना पोलिसांनीही तो फॉरमेट का केला, याविषयी चौकशी केली नाही. त्या स्मार्ट फोनमधील डेटा रिकव्हर करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
पीडित महिलेचा तक्रारीस नकार
बाथरूममधील महिलांचे छायाचित्र काढण्याचा प्रकार पुढे येताच नागरिकांनी पंकज खडसेला पकडले होते. मात्र, ज्या महिलेबाबत हा प्रकार घडला, तिने तक्रार देण्यास नकार दिला. दरम्यान हॉटेलमध्ये थांबलेल्या व मीडियाशी जुळलेल्या एका महिलेने पुढाकार घेऊन राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली.
महिलेला लज्जा उत्पन्न झाल्यामुळे तिच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे. महिलांचे फोटो काढल्याचा संशय तक्रारीतून व्यक्त केला आहे.
- शशिकांत सातव
पोलीस उपायुक्त