आरागिरणीचा परवाना निलंबित
By Admin | Published: February 11, 2017 12:03 AM2017-02-11T00:03:01+5:302017-02-11T00:03:01+5:30
नियमबाह्य लाकूड साठवून ठेवणे, विनापरवानगी आरागिरणी भाड्याने देणे, वनतरतुदींचा भंग आदी कारणांमुळे गोपालनगर एमआयडीसीतील संजय इंडस्ट्रीज (आरागिरणी) महिनाभर बंद राहील.
संजय ‘सॉ-मिल’: ८ मार्चपर्यंत वनविभागाचा मनाई हुकूम
अमरावती : नियमबाह्य लाकूड साठवून ठेवणे, विनापरवानगी आरागिरणी भाड्याने देणे, वनतरतुदींचा भंग आदी कारणांमुळे गोपालनगर एमआयडीसीतील संजय इंडस्ट्रीज (आरागिरणी) महिनाभर बंद राहील. ८ मार्चपर्यंत परवाना निलंबित करण्याचे आदेश सहायक वनसंरक्षकांनी काढले आहेत.
उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या आदेशानुसार सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे यांनी गुरुवारी संजय ‘सॉ -मिल’च्या संचालकांची अवैध लाकडाच्या साठवणुकीप्रकरणी सुनावणी घेतली.
या सुनावणीदरम्यान सॉ-मिलधारकांना बचावाची संधी देण्यात आली. वनाधिकाऱ्यांनी बचाव पक्षाचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, संजय सॉ-मिलचे संचालक आरोपांचे खंडन करू शकले नाहीत. परिणामी वनविभागाने वनगुन्ह्याचा भंग केल्याचा ठपका ठेवून सदर आरागिरणीची परवानगी महिनाभरासाठी निलंबित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. एमआयडीसी परिसरातील संजय सॉ-मिलमध्ये नियमबाह्य लाकूड साठवून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती ३ फेब्रुवारी रोजी सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे यांच्यासह काही वनकर्मचाऱ्यांना मिळाली.
तीन जणांविरुद्ध वन गुन्हे
अमरावती : या माहितीच्या आधारे त्यांनी संजय सॉ मिल (परवाना क्र. ए- २४) चे निरीक्षण केले. निरीक्षणादरम्यान निम प्रजाती इमारती लाकडाचे एकूण २४ नग परिमाण ०.७९४ घनमीटर लाकूड आढळून आले. याइमारती लाकडाचे दस्तऐवज, वाहतूक परवाना अथवा लाकडावर निशाणी (हॅमर) नसल्याचे वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे वनविभागाच्या चमुने हे लाकूड आणि आरागिरणीत उभे आरायंत्र आकार ३६ इंची एक नग व इलेक्ट्रीक मोटार जप्त केली होती. आरागिरणीे परवानाधारक विवेक बोराडे यांच्यासह तीन जणांविरूद्ध महाराष्ट्र वननियमावली २०१४ मधील तरतुदींचा भंग केल्याबाबत प्राथमिक गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा रिपोर्ट क्रमांक २०/९ अन्वये ३ फेब्रुवारी रोजी वनगुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी ९ फेब्रुवारीला सुनावणी घेण्यात आली. सुनावणीअंती वनगुन्ह्यांचा भंग झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. आता ही आरागिरणी महिनाभर बंद राहणार आहे.
अवैध लाकू ड साठवून ठेवल्याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. बचावपक्षाचे म्हणने ऐकून घेतले. वनगुन्ह्यांचा भंग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता संजय सॉ-मिल महिनाभर बंद राहिल.
- राजेंद्र बोंडे
सहायक वनसंरक्षक, अमरावती.