डॉ. भोजनेंच्या गर्भपात केंद्राची नोंदणी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 10:21 PM2018-01-30T22:21:41+5:302018-01-30T22:22:01+5:30
स्थानिक बुटी प्लॉट स्थित डॉ. वैशाली भोजने यांच्याकडील वैद्यकीय गर्भपात केंद्राची नोंदणी निलंबित करण्यात आली आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : स्थानिक बुटी प्लॉट स्थित डॉ. वैशाली भोजने यांच्याकडील वैद्यकीय गर्भपात केंद्राची नोंदणी निलंबित करण्यात आली आहे. त्यांना वैद्यकीय गर्भपात करण्यास मनाई करण्यात आली असून, त्यांनी वैद्यकीय गर्भपात केंद्राचा फलक लावू नये, असेही बजावण्यात आले आहे. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
एमटीपी कायद्यान्वये बुटी प्लॉट येथील भोजने मॅटर्निटी व नर्सिंग होमच्या ठिकाणी वैद्यकीय गर्भपात केंद्राला मान्यता देण्यात आली असून, ते महापालिकेत नोंदणीकृत होते. मूर्तिजापूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेचा येथे गर्भपात करण्यात आला होता. ती भोजने यांच्याकडे उपचार घेत होती. ही महिला रुग्ण १२ डिसेंबरला भोजने यांच्याकडे उपचाराकरिता आली असता, भोजने यांनी तिला दाखल करून आॅपरेशन थिएटरमध्ये घेतले. मात्र, पुढील उपचाराकरिता आयसीयूची गरज भासू शकते म्हणून भोजने यांनी त्या महिलेला प्रथम बोंडे हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे भरती करून न घेतल्याने पीडीएमएमसीमध्ये भरती केले. हा सर्व खुलासा डॉ. भोजने यांनी दिला आहे. या महिलेचा गर्भपात होऊन तिची प्रकृती अतिशय चिंताजनक झाली होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पीडीएमएमसी व डॉ. वैशाली भोजने यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेतली.
दरम्यान, रुग्ण महिलेचे बयाण, त्या महिलेच्या पतीचे बयाण, डॉ. वैशाली भोजने यांचा खुलासा यात अनियमितता असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यावरुन नोंदणी (मान्यता) निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.
प्रथमदर्शनी निष्कर्ष
संबंधित महिला रुग्णाचा वैद्यकीय गर्भपात करण्यात आला असावा व हेतुपुरस्सर ‘एमटीपी’ रेकॉर्ड न भरता इतर कारणाकरिता भरती झाल्याचे व आपोआप गर्भपात झाल्याचे भासविण्यात आले, असे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी नोंदविले. चौकशी सुरू असून, वैद्यकीय गर्भपात केंद्राची नोंदणी (मान्यता) निलंबित करण्यात आल्याचे डॉ. वैशाली भोजने यांना कळविण्यात आले आहे.