मनपातील कनिष्ठ लिपीक निलंबित
By admin | Published: May 3, 2016 12:19 AM2016-05-03T00:19:06+5:302016-05-03T00:19:06+5:30
कार्यालयात वारंवार गैरहजर राहणाऱ्या अनुप भगवान सारवान या कनिष्ठ लिपिकाला सोमवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
आयुक्तांची कारवाई : कार्यालयात गैरहजर राहणे भोवले
अमरावती : कार्यालयात वारंवार गैरहजर राहणाऱ्या अनुप भगवान सारवान या कनिष्ठ लिपिकाला सोमवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. महापालिकेतील कार्यकारी अभियंता २ या कार्यालयात कार्यरत असलेल्या सारवान यांच्या निलंबनाचा आदेश महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी काढला.
२९ एप्रिल रोजी रमाई आवास योजनेसंबंधी झालेली बैठक आणि वैयक्तिक शौचालयाविषयी ३० एप्रिलच्या सभेत प्राथमिक स्वरुपात किती लाभार्थ्यांची यादी ठेवावी, यासंबंधी घेतलेल्या आढावा बैठकीत सारवान हे समाधानकारक उत्तर देवू शकले नाही. अनुप सारवान हे शौचालयाच्या पुढील टप्पा देण्याबाबतही टाळाटाळ करीत असल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी घरकूल, शौचालय योजनेचा लाभ घेणाऱ्यांना वेळेवर मंजूर निधीचे धनादेश मिळत नसल्यामुळे त्यांच्याबाबत तक्रारी झाल्यात. यासंबंधाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तथापि त्यांनी खुलासा सादर केला नाही. कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या. परंतु ते हजर नसल्याचे दिसून आले. यावरून त्यांनी कार्यालयीन कामात अडथळा निर्माण केला, असे निरीक्षण आयुक्तांनी नोंदविले. अनुप सारवान यांची वागणूक कार्यालयीन शिस्तीला अनुसरुन नसून त्यांनी मनासे (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ (१) (२) (३) चे उल्लंघन केले, असा ठपका ठेऊन सारवान यांना तत्काळ निलंबित करीत असल्याचा आदेश सोमवारी आयुक्तांनी पारित केला. निलंबन काळात ते मुख्यालय झोन क्र. ३ येथे राहतील. या कारवाईमुळे महापालिकेत खळबळ माजली आहे.