पाच कृषीसेवा केंद्रांचे परवाने निलंबित
By admin | Published: May 27, 2017 12:04 AM2017-05-27T00:04:42+5:302017-05-27T00:04:42+5:30
खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जि.प.च्या कृषी विभागाने भरारी पथकाची स्थापना केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जि.प.च्या कृषी विभागाने भरारी पथकाची स्थापना केली आहे. यापथकाने केलेल्या तपासणीत अनियमितता आढळल्याने शहरातील पाच कृषीसेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले गेले.
जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी वरूण देशमुख यांच्या नेतृत्वातील भरारी पथकाने शहरातील व्यंकटेश कृषी केंद्र, रामदेव ट्रेडर्स,आनंद ट्रेडर्स, दत्त कृषी मंदिर या चार दुकानांच बियाणे तर अंकुर ट्रेडर्सचा रासायनिक खतांचा परवाना निलंबित केला आहे.कृषी केंद्रांची तपासणी केली असता अनेक त्रुटी आढळल्यात. याआधारे भरारी पथकाचे प्रमुुख, कृषी अधिकारी वरूण देशमुख, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक पुरूषोत्तम कडू, कृषी अधिकारी रवीकांत उईके आदींनी परवाने निलंबनाची शिफारस केली होती. त्यानुषंगाने बियाणे नियंत्रण आदेश १९८३ चे उल्लंघन केल्याने चार बियाणे परवाने तसेच रासायनिक खते नियंत्रण आदेश १९८५ चे उल्लंघन केल्याने एक खत परवाना निलंबित केला आहे. खरीप हंगामात गुणवत्ता नियंत्रणासाठी कृषी केंद्रांची तपासणी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती झेडपीचे कृषी विकास अधिकारी उदय काथोडे यांनी दिली.