वसुली लिपीक निलंबित
By admin | Published: June 7, 2016 07:33 AM2016-06-07T07:33:29+5:302016-06-07T07:33:29+5:30
झोन क्रमांक ५ च्या कार्यालयातील करवसुलीची पावती पुस्तके गहाळ केल्याप्रकरणी वसुुली लिपीक पंकज डोनारकर याला सोमवारी निलंबित करण्यात आले.
महापालिका : आयुक्त पवार यांची पहिली कारवाई
अमरावती : झोन क्रमांक ५ च्या कार्यालयातील करवसुलीची पावती पुस्तके गहाळ केल्याप्रकरणी वसुुली लिपीक पंकज डोनारकर याला सोमवारी निलंबित करण्यात आले. आयुक्त हेमंत पवार यांची ही पहिलीच कारवाई आहे. पवारही गुडेवारांचाच कित्ता गिरवतात की काय, या धास्तीने मनपा वर्तुळात खळबळ माजली आहे.
दक्षिण झोन कार्यालयातील १२३७९ आणि १२३९६ या क्रमांकाची दोन पावती पुस्तके गहाळ झाल्याचे उपायुक्तांच्या निदर्शनास आले. पावती पुस्तकाबद्दल तेथील कर्मचारी चर्चा करीत असताना कहाळे हे कर्मचारी स्टॉक रजिस्टरची तपासणी करण्याकरिता दुसऱ्या खोलीत गेले असता पंकज डोनारकर यांनी १२३७९ क्रमांकाचे पावती पुस्तक रेखा बैस यांच्या कपाटात परत आणून ठेवले. डोनारकर यांना विचारणा केली असता त्यांनी उलट आरोप केले आणि ते कार्यालय सोडून निघून गेले. डोनारकर यांनी कर वसुलीची पुस्तके गहाळ केल्याने आर्थिक नुकसान केल्याचे नाकारता येणार नाही, म्हणून डोनारकर यांच्या निलंबनाचे आदेश सोमवारी काढण्यात आले. त्यांना पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी काढलेल्या आदेशात नमूद आहे. (प्रतिनिधी)