झेडपी अध्यक्षांच्या पत्नीसह तीन शिक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 10:45 PM2018-08-05T22:45:29+5:302018-08-05T22:46:02+5:30
शिक्षक बदलीमध्ये मेळघाटातील धारणी पंचायत समितीअंतर्गत नियुक्ती मिळालेल्या जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी ४ आॅगस्ट रोजी निलंबित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिक्षक बदलीमध्ये मेळघाटातील धारणी पंचायत समितीअंतर्गत नियुक्ती मिळालेल्या जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी ४ आॅगस्ट रोजी निलंबित केले. तिघांपैकी दोघांनी बदली आदेश धुडकावत राजकीय दबाब आणल्याने, तर एक शिक्षक रुजू झाल्यानंतर सुटीवर गेला आहे. निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या पत्नी सुजाता मोटघरे यांच्यासह सुनील यावलीकर व संजय हिरूळकर या दोन शिक्षकांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या पहिल्यांदाच राज्यस्तरावरून आॅनलाइन बदल्या करण्यात आल्या आहेत. यात काहींना सोईच्या ठिकाणी, तर काहींना मेळघाटात बदली मिळाली. त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांमध्ये ‘कही खुशी, कही गम’चे वातावरण पसरले आहे. मेळघाटात बदली झालेल्या काही शिक्षकांनी तेथून बाहेर पडण्यासाठी राजकीय दडपण आणण्याचे प्रयत्न केले. लॉबिंग करून बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचेही टाळण्याचे प्रकार पुढे आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या निदर्शनास हा घटनाक्रम आला आहे. या बाबीची दखल घेत ४ आॅगस्ट रोजी आॅनलाइन जिल्हांतर्गत बदलीप्रक्रियेत मेळघाटातील धारणी पंचायत समितीमधील गावांतील शाळांवर नियुक्ती मिळालेल्या सुजाता मोटघरे व सुनील यावलीकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. बदली आदेशानंतरही शाळेवर रुजू न होता आदेश धुडकवण्यासाठी राजकीय दबाबतंत्राचा वापर केल्याचा ठपका या दोन शिक्षकांवर ठेवला आहे. संजय हिरूळकर नामक शिक्षक रंगुबेली शाळेवर रुजू झाले. मात्र, त्यानंतर सुटी टाकून गैरहजर असल्याने सीईओ मनीषा खत्री यांनी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती शिक्षण विभागाचे सूत्रांनी दिली. सीईओंच्या या कारवाईमुळे शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सीईओंच्या धडक कारवाईची चर्चा
जिल्हा परिषद शिक्षक बदली आदेश धुडकावत राजकीय दबाब आणल्याप्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या पत्नीसह अन्य दोन शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केल्याने जिल्हा परिषदेसह शिक्षकांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला होता. विशेष म्हणजे, या कारवाईबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.
तीन शिक्षकांवर सीईओंनी केलेल्या निलंबन कारवाईची सत्यता तपासली जाईल. त्यानंतर यासंदर्भात योग्य कारवाई केली जाईल.
- नितीन गोंडाणे
अध्यक्ष, जिल्हा परिषद
मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तीन शिक्षकांचे निलंबनाचे आदेश शनिवारी काढले. सदर आदेश संबंधित पंचायत समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहेत.
- वामन बोलके
उपशिक्षणाधिकारी प्राथमिक