डिजिटायझेशनला स्थगिती, सेटटॉपबॉक्समधून लूट सुरूच
By admin | Published: January 10, 2016 12:13 AM2016-01-10T00:13:30+5:302016-01-10T00:13:30+5:30
केबल ग्राहकांसाठी केलेल्या सेटटॉप बॉक्स सक्तीला हायकोर्टाने सहा आठवडे स्थगिती दिली असली तरी त्यानंतर सेट टॉप बॉक्स सक्तीची टांगती तलवार ...
केबल आॅपरेटरमध्ये ‘वॉर’ : सोशल मीडियात उलटसुलट चर्चा
अमरावती : केबल ग्राहकांसाठी केलेल्या सेटटॉप बॉक्स सक्तीला हायकोर्टाने सहा आठवडे स्थगिती दिली असली तरी त्यानंतर सेट टॉप बॉक्स सक्तीची टांगती तलवार ग्राहकांवर कायम असल्याने केबल आॅपरेटर्सकडून बॉक्स जोडणीचे काम सुरूच आहे. ग्राहकांचा सेटटॉप बॉक्स जोडलीला विरोध नाही. मात्र यासाठी घेतल्या जाणाऱ्या अव्वाच्यासव्वा रकमेच्या विरोधात तक्रारी वाढत आहेत. करणमूक कर विभागाने दरांवर नियंत्रण ठेवण्याबाबत हात झटकल्याने केबल आॅपरेटर्सना आयती संधी मिळाली आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या डिजिटायझेशनच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे.
ही स्थगिती अजून काही आठवडे आहे. मात्र दरम्यानच्या काळात सेट टॉप बॉक्स जोडणीचे काम केबल आॅपरेटर्सनी सुरूच ठेवल आहे. ३१ डिसेंबरनंतर केबल नेटवर्क पूर्णत: ठप्प झाले होते. त्यामुळे ग्राहकांकडून सेटटॉप बॉक्सच्या दराची जाहिरात मोठ्या प्रमाणात केली. एक केबल नेटवर्क एका सेटटॉप बॉक्ससाठी १२०० तर दुसऱ्या सेटटॉप बॉक्ससाठी १५०० रुपये आकारला आहे. इंस्टॉलेशन आणि अॅक्टीव्हेशन चार्जेसच्या नावाखाली ३००-४०० रुपये प्रतिग्राहकांकडून वसूल केले जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या डोकेदुखीत भर पडली आहे.
सोशल मीडियात गोंधळ
केबल सेवा पुरविणाऱ्या बहुवैध यंत्रणा परिचालकांपैकी काहींनी सोशल मीडिया ‘व्हॉट्स अॅप’चा वापर करत गोंधळात भर टाकली आहे. एकाकडून २०० रुपये प्रतिमहिना तर दुसऱ्याकडून १०० रुपये प्रति महिन्याची ग्वाही वा प्रलोभन दिले जात आहे. शहरातील दोन मुख्य केबल संचालकांमधील अंतर्गत हेव्यादाव्यांनी ग्राहकांची मात्र तारांबळ उडाली आहे.
सेटटॉप बॉक्सची किंमत, दर्जा आणि अॅक्टीवेशन चार्जबाबत उलटसुलट चर्चा सुरूच आहे. सेटटॉप बॉक्स जोडणीची घाई करुनका, असेही संदेश फिरत आहेत. त्यामुळे खरे काय? आणि खोटे काय? याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था वाढली आहे. जीटीपीएएच्या सेटटॉप बॉक्सवर २००० रुपये अशी किंमत अंकित आहे. मात्र त्याचे १५०० रुपये घेतले जात आहे.
इन्स्टॉलेशन आणि अॅक्टिव्हेशन चार्जमध्येही मोठी तफावर आहे. त्यामुळे मूळची किंमत एक हजार रुपयांच्या आसपास असावी, असा अंदाज आहे. त्यामुळे सक्तीच्या नावावर लूट होण्याचा धोका ग्राहक व्यक्त करीत आहेत. काही केबल आॅपरेटर्सनी स्वत:ची मनमानी दरांची आकारणी करून ग्राहकांची लूट सुरू केली आहे. (प्रतिनिधी)