राज्य शासनाची स्थगिती तरीही आरएफओंच्या बदल्या!
By गणेश वासनिक | Published: June 18, 2023 04:50 PM2023-06-18T16:50:47+5:302023-06-18T16:50:59+5:30
११ मुख्य वनसंरक्षकांना अहवाल पाठविण्याच्या सूचना, नागपूर येथील वन भवनाने हात झटकले
अमरावती : राज्यात वनपरिक्षेत्राधिकारी (आरएफओ) यांच्या प्रशासकीय बदल्यांना स्थगिती असताना सुद्धा तीन आरएफओंच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यात एका आमदारांचा नातेवाईक असल्याची असल्याची विश्वसनीय माहिती आहे. तर दुसरीकडे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी यापूर्वी केलेल्या आरएफओंच्या बदल्यांचा अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश वन भवनाने काढून हात झटकल्याचे वास्तव आहे. या स्थगितीमुळे वन प्रशासन ढेपाळले असून १०० च्या जवळपास आरएफओ ‘आसमान से गिरा और खजूर मे अटका’ अशा स्थितीत आहेत.
मे २०२३ मध्ये ११२ आरएफओंच्या बदल्या करण्यात आल्या हाेत्या. तथापि, या बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारीवरून महसूल व वन विभागाने २ जून रोजी आरएफओंच्या या बदल्यांवर स्थगिती देत याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. आरएफओंच्या बदली प्रकरणी प्रधान वन सचिव चौकशी करीत आहेत. तसेच वनबल प्रमुख वाय.एल.पी. राव यांनी केलेल्या ३३ आरएफओंच्या राज्यस्तरीय बदल्यांचे अहवाल शासनास सादर केले आहे. बदल्यांवर स्थगिती कायम असताना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विदेश दौऱ्यावर असताना १६ जून रोजी तीन आरएफओंच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाले आहे. यात एका आमदारांचा नातेवाईक असल्याची माहिती आहे. रेंजर्स असोसिएशनने बदल्यांवरील स्थगिती हटविण्याची मागणी वनमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.