वृक्षकटाईला स्थगिती, तोवर तीन झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2022 11:51 PM2022-10-29T23:51:45+5:302022-10-29T23:55:16+5:30
दर्यापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनी नगरपालिका दरम्यान कडुलिंबाची झाडे कापण्याचे काम शनिवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात पालिका प्रशासनाने हाती घेतले. मात्र, वृक्षप्रेमी संघटना व नागरिकांनी वृक्ष तोडण्यास प्रचंड विरोध दर्शविला. काहींनी झाडांवर चढून ठाण मांडले. त्यानंतर तहसीलदार योगेश देशमुख व वृक्षप्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्षतोडीला स्थगिती दिल्यानंतर हे काम थांबविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : शहरातील रस्त्याच्या कामासाठी दर्यापूर नगरपालिका प्रशासनाकडून शनिवारी पोलीस बंदोबस्तात तीन कैक दशके जुनी कडुनिंबाची झाडे कापण्यास प्रारंभ केला. वृक्षप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करून स्थगिती मिळवेपर्यंत तीन झाडे कापण्यात आली होती. सध्याची वाहतूक पाहता, जेवढी रुंदी आवश्यक आहे, त्यावर काम केल्यास झाडे कापण्याची आवश्यकता नाही, असा वृक्षप्रेमींचा दावा आहे.
दर्यापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनी नगरपालिका दरम्यान कडुलिंबाची झाडे कापण्याचे काम शनिवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात पालिका प्रशासनाने हाती घेतले. मात्र, वृक्षप्रेमी संघटना व नागरिकांनी वृक्ष तोडण्यास प्रचंड विरोध दर्शविला. काहींनी झाडांवर चढून ठाण मांडले. त्यानंतर तहसीलदार योगेश देशमुख व वृक्षप्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्षतोडीला स्थगिती दिल्यानंतर हे काम थांबविण्यात आले. यानंतर वृक्षप्रेमींनी तहसीलदार आणि मुख्याधिकारी व नगरपालिका प्रशासक यांना निवेदन दिले. वृक्ष प्राधिकरणातील तज्ज्ञ सदस्यांनी झाडांचे नमूद केलेले वय योग्य आहे, तर वनकर्मचाऱ्यांनी दिलेला वयाचा अहवाल खोटा आहे. त्यामुळे पुन्हा एसीएफ दर्जाचे वनाधिकारी व वनस्पतिशास्त्र तज्ज्ञांच्या समितीकडून वृक्षांच्या वयाबाबत नवीन अहवाल तयार करावा. तोपर्यंत वृक्षकटाईला स्थगिती द्यावी, असे निवेदनात नमूद आहे. याशिवाय नियमात बसत नसलेल्या झाडांची कत्तल केल्याबद्दल कारवाईची मागणी दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रारीतून देण्यात आली.
वयाचे गौडबंगाल
वृक्ष समितीच्या १६ फेब्रुवारी २०२१ च्या सभेतील वृक्ष प्राधिकरणाच्या तज्ज्ञ सदस्यांनुसार झाडांचे सुमारे १०० वर्षे वय आहे. ५० वर्षांपेक्षा जुनी झाडे तोडण्यासाठी वेगळे निकष लागतात, तर २०० हून अधिक एकत्रित वृक्ष तोडण्यासाठी थेट मंत्रालय स्तरावर परवानगी घ्यावी लागते. हा ससेमिरा टाळण्यासाठी स्थानिक पातळीवरच्या वनकर्मचाऱ्याला हाताशी धरून झाडांची वये कमी करून घेण्यात आली, असे निवेदनात नमूद आहे.
ठरावाच्या दहापट वृक्षतोड?
रस्ता विकासकामाकरिता वृक्ष प्राधिकरणाच्या ठरावानुसार ४०, तर पालिकेकडून प्रसिद्ध निविदेत ३९९ वृक्ष कटाई करण्याचे नमूद करण्यात आले. प्रशासनाने जाहिरात पुन्हा प्रकाशित करण्याचे सांगितले, मात्र काहीही केले नाही.
जनसुनावणी कुठे?
नियमानुसार वृक्षतोड करायची असल्यास नगर परिषद अंतर्गत असणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाने जनसुनावणी घेणे आवश्यक असते. जनतेचे लेखी आक्षेप, मागण्या अपेक्षित असतात. परंतु, या निर्देशांचे पालन या ठिकाणी करण्यात आले नाही, असे निवेदनात नमूद आहे.
रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोड पूर्णतः नियमबाह्य आहे. पुरातन वृक्षाबाबतच्या शासकीय नियमांचे यात पालन केले गेले नाही.
- शेखर पाटील, वृक्षप्रेमी, दर्यापूर
नियमाचे पालन करूनच झाडे तोडण्याचे काम सुरू होते. स्थानिक वनविभागाकडून वयाबाबतचे मूल्यमापन केले आहे.
- नंदू परळकर, प्रशासक,
दर्यापूर, नगरपरिषद