अंतरगाव शासकीय आश्रमशाळा अधीक्षकाचे निलंबन; आक्षेपार्ह मॅसेज पाठविणे भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 03:32 PM2020-02-26T15:32:23+5:302020-02-26T15:33:33+5:30
कायापालट दौऱ्यातील सदस्यांवर नजर
अमरावती : यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील अंतरगाव येथील शासकीय आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी आक्षेपार्ह मॅसेज पाठविल्याप्रकरणी २४ फेब्रुवारी रोजी ‘ट्रायबल’च्या अपर आयुक्तांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. पवन मोतेवार, असे निलंबित अधीक्षकांचे नाव आहे.
अदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ अंतरगाव येथे शासकीय आश्रमशाळा आहे. पांढरकवडा एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत या आश्रमशाळेचा कायापालट अंतर्गत १ मार्च ते ३० एप्रिल २०१९ दरम्यान दौरा झाला. मात्र, दौरा आटोपल्यानंतर अधीक्षक मोतेवार यांनी पथकातील एका युवतीला मोबाइलवर आक्षेपार्ह मॅसेज पाठविला होता. या मॅसेजबाबत सदर युवतीने नाराजी व्यक्त केली. पुन्हा मॅसेज आल्याने या युवतीने आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्याकडे ३० एप्रिल २०१९ रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने ३ जून २०१९ रोजी महिला दक्षता पथकाने चौकशी केली.
दक्षता पथकाने सादर केलेल्या चौकशी अहवालाच्या आधारे अधीक्षक मोतेवार यांची १ जानेवारी २०२० रोजी विभागीय चौकशी करण्यात आली. यात पवन मोतेवार यांचे वर्तन अतिशय गंभीर स्वरूपाचे असून, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ चे नियम ३ चा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अधीक्षक मोतेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांचे मुख्यालय औरंगाबाद प्रकल्प कार्यालय असणार, असे आदेश अमरावतीचे अपर आयुक्त विनोद पाटील यांनी निर्गमित केले आहे.