नव्या मालमत्तांवर संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:25 AM2018-01-28T00:25:22+5:302018-01-28T00:25:38+5:30

नगरसेवकांच्या सहा स्मरणपत्रानंतरही प्रशासन वाढीव मालमत्तांचा तपशिल देऊ न शकल्याने कराच्या वाढीव मागणीवर संशयकल्लोळ उठला आहे.

Suspicion on new properties | नव्या मालमत्तांवर संशयकल्लोळ

नव्या मालमत्तांवर संशयकल्लोळ

Next
ठळक मुद्देसहा स्मरणपत्रे : पवारांच्या कार्यकाळात २१ हजार मालमत्ता शोधल्याचा दावा

आॅनलाईन लोकमत
अमरावती : नगरसेवकांच्या सहा स्मरणपत्रानंतरही प्रशासन वाढीव मालमत्तांचा तपशिल देऊ न शकल्याने कराच्या वाढीव मागणीवर संशयकल्लोळ उठला आहे. सहा महिन्यांत महापालिकेने २० हजारांपेक्षा अधिक मालमत्ता शोधून काढल्या व त्यातून कराच्या मागणीत १० कोटींची भर पडल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मात्र पाच महिन्यानंतरही प्रशासन याबाबतचा तपशिल देऊ शकले नाहीत. त्यामुळे महापालिकेचा हा दावा निखालस खोटा असल्याचा आरोप नगरसेवकांमधून होऊ लागला आहे.
महापालिका आयुक्त हेमंत पवार, कर संकलन अधिकारी महेश देशमुख यांनी याबाबत वेळोवेळी बैठका घेऊन मालमत्ताकराच्या मागणीत नव्या मालमत्तांनी भर टाकल्याचा दावा केला होता. देशमुख यांच्या माहितनुसार, ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत महापालिकेच्या करवसुली यंत्रणेने ९ कोटी ३७ लाख ५२ हजार ४९९ रूपये कर आकारण्यात आलेल्या मालमत्तांचा शोध लावला. त्या मालमत्ता कराच्या अखत्यारित आणल्या आहेत. त्यामुळे ३७ कोटी रुपये करवसुलीची मागणी ४७.२२ कोटी ंवर पोहोचली. त्या पार्श्वभूमिवर प्रशासनाचे कौतुक करून भाजपचे नगरसेवक धीरज हिवसे यांनी ८ सप्टेंबर २०१७ रोजी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले. महापालिकेतील ५ झोनमधील कर लिपिकांनी तीन महिन्यांत केलेले काम प्रशंसनीय आहे. २० हजार १२६ नवीन मालमत्तांचा शोध लागल्याने १० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न वाढले आहेत. त्या नव्या मालमत्तांचा तपशील आपल्याला सीडी व पेनड्राईव्हमध्ये उपलब्ध करून देण्याची विनंती हिवसे यांनी केली. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कार्यकाळातही अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांकडून मालमत्तांचे मोजमाप करण्यात आले होते. त्यावेळी नव्या मालमत्ता कराच्या अखत्यारित आणण्यात आल्या. त्या पार्श्वभूमिवर गुडेवारांच्या कार्यकाळात उघड झालेल्या मालमत्ता व मागील सहा महिन्यांत नव्याने शोधण्यात आलेल्या मालमत्तांमधील तफावत आपल्याला जाणून घ्यायची असल्याने तो संपूर्ण तपशील द्यावा, अशी मागणी हिवसे यांनी केली आहे. मात्र सहा स्मरणपत्रानंतरही तो तपशील न मिळाल्याने आता नव्याने शोधण्यात आलेल्या मालमत्तांचा आकडा उगाचाच फुगवून दाखविण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.

नगरसेवकालाही हेलपाटे
८ सप्टेंबर १७ ला हिवसे यांनी मालमत्ताविषयक माहिती मागितली. त्यानंतर २८ आॅक्टोबर, १४ नोव्हेंबर, ७ डिसेंबर, २८ डिसेंबर २०१७ सह ११ जानेवारी व २४ जानेवारीस स्मरणपत्रे दिली. मात्र झोन १ वगळता अन्य कुठलाही तपशील हिवसे यांना मिळालेला नाही. सप्टेंबरपासून मागितलेली माहिती जानेवारी अखेरपर्यंत मिळत नसेल तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दोन्ही आयुक्तांच्या कार्यकाळात शोधलेल्या मालमत्तांचा तपशील मागितला आहे. मूळ पत्रानंतर सहा स्मरणपत्रेही दिली. माहिती अप्राप्त आहे.
- धीरज हिवसे,
नगरसेवक, प्रभाग क्र. ५

Web Title: Suspicion on new properties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.